कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटींच्या आराखड्याला गुरुवारी नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. या अंतर्गत पुरातत्व खात्याच्यावतीने अंबाबाई मंदिराचे मूळ दगडी बांधकाम, गळती, शिल्पांचे जतन संवर्धनाची कामे करून मूळ ढाच्याचे सक्षमीकरण केले जाणार आहे. यातील प्रस्तावित कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन विभागाने ३१ मार्च २०२८ पर्यंतची मुदत दिली असून संनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.श्री अंबाबाई मंदिराच्या १४४५ काेटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे २०२५ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आराखड्याच्या कार्यवाहीचे टप्पे व कामांचा प्राधान्यक्रम याबाबत उच्चाधिकार समितीने छाननी करून १६ जुलै २०२५ रोजी पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटींच्या पुरातत्वीय कामांना मान्यता दिली. तसेच भूसंपादनाचे धोरण व कार्यपद्धती ठरविण्यासाठी नगर विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या भूसंपादन समितीचा अहवाल मिळाल्यानंतर उर्वरित कामांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल. अंबाबाई आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता मिळाली असली तरी प्रशासकीय मान्यता अजून मिळाली नव्हती. प्रशासकीय मान्यता मिळाल्याशिवाय पुढे निधीची तरतूद व विकासकामांना सुरुवात होत नाही. अखेर गुरुवारी नियोजन विभागाने पहिल्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मान्यता दिली.
अध्यादेशातील तरतूदी..
- आराखड्यातील कामांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी हे संनियंत्रण अधिकारी असतील.
- प्रस्तावित कामे ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करावीत
- पहिला टप्पा वगळता अन्य कामांचा समावेश यात असू नये
- कामांची द्विरूक्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
- वास्तू जतन संवर्धनाची कामे पुरातत्व तसेच राज्य पुरातत्व विभागाकडून करून घ्यावी.
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीआराखड्यातील कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आराखड्याशी संबंधित विभागांच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश असलेली एक जिल्हास्तरीय तांत्रिक समिती गठित करण्यात येणार आहे. यात जिल्हा नियाेजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
पहिल्या टप्प्यातील कामे-श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा पहिला टप्पा साडेचारशे कोटींचा असला तरी सध्या त्यातील मंदिर व परिसर जतन संवर्धनाच्या १४३ कोटींच्या आराखड्याला मान्यता मिळाली आहे. यात मंदिराच्या दगडी बांधकामाचे सक्षमीकरण, जतन संवर्धन, सुटलेले दगड जोडणे, छताची गळती काढणे, शिल्पांचे मूळ स्वरूप खुलवणे व डागडूजी, मंदिर परिसरातील खासगी मंदिरांचेही जतन संवर्धन, दगडांवरील रंग काढून मूळ स्वरुपात आणणे ही कामे केली जातील.