राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!

By Admin | Updated: April 9, 2015 00:05 IST2015-04-08T22:50:48+5:302015-04-09T00:05:54+5:30

सातारा जिल्ह््यात ‘सत्तासंघर्ष’ : उदयनराजे अन् रामराजेंचा ‘साम्राज्यवाद’ बारामतीकरांच्या नियंंत्रणाबाहेर

Royal history made new 'history'! | राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!

राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!

सातारा : जिल्ह्याच्या इतिहासात ‘न भूतो न भविष्यति’ एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणाऱ्या ‘राजघराण्याचा संघर्ष’ आता टोकाला पोहोचलाय. कधीकाळी ‘मराठी साम्राज्याचा इतिहास’ घडविणारी ही दोन दिग्गज राजघराणी आज त्वेषानं एकमेकांवर तुटून पडताना पाहून अवघा महाराष्ट्र अचंबित झालाय. ‘राजकीय इगो’मुळं उडालेल्या या भडक्यामागचं खरं कारण मात्र निव्वळ ‘साम्राज्यवाद’, हेच ठरलंय!
वेगवेगळ्या प्रांतातील प्रस्थापित नेत्यांना एकत्र आणून स्थापन केलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी. मग यात कुणी सरदार तर कुणी सुभेदार. यांच्यातही अंतर्गत ‘सवतासुभा’ असला तरी साताऱ्यात सध्या रंगलेला ‘राजसंघर्ष’ मात्र भलताच अतर्क्य, अगम्य... कारण, एकमेकांना शब्दबंबाळ करणारे हे दोन्हीही नेते ऐतिहासिक राजघराण्यातले. उदयनराजे हे छत्रपती शिवरायांच्या घराण्याचे वंशज, तर छत्रपतींच्या पत्नी सईबाई यांचं माहेर असलेल्या निंबाळकर घराण्याचे रामराजे वारस. एका अर्थानं निंबाळकर म्हणजे उदयनराजेंच्या ‘शिव’घराण्याचं मातुलच. तरीही गेल्या पंधरा दिवसांपासून या दोघांमध्ये जहरी वाक्युध्द पेटलेलं. ‘उदयनराजे हे छत्रपतींचे थेट वंशज नव्हतेच’ असा दावा रामराजेंनी केलेला.. तर ‘छत्रपतींबद्दल बोलाल तर जीभ हासडून हातात देऊ’ अशी धमकी उदयनराजेंनी दिलेली.
दोघेही आपापल्या राजधानीत ‘राजे’ असले तरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. एक खासदार तर दुसरे विधानपरिषद सभापती. तरीही आरोप-प्रत्यारोपाच्या रणधुमाळीत दोघांनी जो शब्दच्छल केला, तो अत्यंत धक्कादायक ठरणारा. विशेष म्हणजे, या वादात बिलकूल न पडता तटस्थपणे ‘चुप्पी’ साधणाऱ्या शरद पवारांची भूमिकाही आश्चर्यचकित करणारी. अजित पवारांनी जरी ‘पोरकटपणा थांबवावा,’ असा पोक्त सल्ला दिला असला तरी उदयनराजेंनी पुन्हा त्यांच्यावरही ‘शालजोडी’तून प्रहार केलाय. ‘सभापतींना पोरकटपणाची उपमा देऊन अजितदादांनी महाराष्ट्राचा अपमान केला’ असं जाहीर करून पक्षाला अधिकच बुचकळ्यात टाकलंय.
‘नीरा नदीचं पाणी बारामतीला पळविलं,’ या कारणावरून दोन्ही राजेंमध्ये वादाला तोंड फुटलं असलं तरी यामागे दडलीय गेल्या पाच वर्षांमधील खदखद. ‘सरकारी कार्यक्रमात खासदारांना न बोलविणं, त्यांनी सुचविलेली कामे तांत्रिक कारणं दाखवून रखडविणं, जिल्हा बँकेत शब्दाला मान न देणं’, अशा अनेक घटनांमागे तत्कालीन पालकमंत्री रामराजेच असल्याची तक्रार उदयनराजे गटाकडून वारंवार केली गेलेली. तर ‘पक्षाच्या व्यासपीठावर प्रोटोकॉल न पाळणं, आपल्याच नेत्यांवर ऊठसूट टीका करणं, सामाजिक अन् सार्वजनिक सभ्यता ओलांडणं’, असे आरोप रामराजे गटाकडून खासगीत केले गेलेले. मात्र, मनात कटुता असूनही दोघे सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचा आदर राखून राहिलेले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर सातारा जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळाला. ‘कट्टर पवारविरोधक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय शिवतारेंनी डीपीसी बैठकीच्या व्यासपीठावर उदयनराजेंना मोठ्या आदरानं बसवून घेतलं. तेव्हाच ‘जमाना बदल गया है,’ याची चुणूक मिळाली. यावेळी ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा टोमणा रामराजेंनी हाणताच शीतयुध्द भडकलं. त्यातच ‘श्रीराम’ कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंनी पारंपरिक विरोधकांना पाठबळ दिल्यानं रामराजे पुरते डिवचले गेले. त्यानंतर या दोघांच्या पत्रकबाजीत दोन्हीही घराण्याच्या अनेक पिढ्यांचा इतिहासही बाहेर आला. एवढं सारं घडूनही जिल्ह्यातील एकाही नेत्यानं याबाबत अवाक्षर काढलं नाही; कारण या दोघांमधली ईर्षा होती साम्राज्यवादाची. या वादाला किनार होती अनादिकाळापासून राजे-राजवाड्यांमध्ये चालत आलेल्या सत्तासंघर्षाची. (प्रतिनिधी)

अबब... प्राण्यांचा भलताच धुमाकूळ!
उदयनराजे यांनी सुरुवातीला रामराजेंना ‘मर्कट’ म्हटलं. तेव्हा रामराजेंनी चिडून त्यांना ‘बोकड’ ही उपाधी दिली. तसंच पालकमंत्री शिवतारे म्हणजे ‘अस्वल’ या शब्दात त्यांचीही खिल्ली उडविली. तेव्हा शिवतारे यांनी रामराजेंना ‘पवारांच्या ताटाखालचं मांजर’ अशी उपाधी दिली. ‘वाघ अन् अस्वल’ यातला फरक न समजणाऱ्यांवर मानसिक उपचाराची गरज आहे, असा टोलाही लगावला. आता हे सारे प्राणी कमी पडले की काय म्हणून ‘समुद्रात पडलेलं डबक्यातलं बेडूक’ अशी रामराजेंची संभावना उदयनराजेंनी केलीय. आता बोला..

Web Title: Royal history made new 'history'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.