अरुण डोंगळे यांची भूमिका अपेक्षितच; मात्र वेळ चुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:36+5:302020-12-15T04:40:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी सत्तारूढ गटाशी फारकत घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...

The role of Arun Dongle is expected; But missed the time | अरुण डोंगळे यांची भूमिका अपेक्षितच; मात्र वेळ चुकली

अरुण डोंगळे यांची भूमिका अपेक्षितच; मात्र वेळ चुकली

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी सत्तारूढ गटाशी फारकत घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत राहण्याचा घेतलेला निर्णय तसा अपेक्षितच होता. मात्र, त्यांची वेळ चुकल्याची चर्चा सध्या ‘राधानगरी’सह ‘गोकुळ’च्या राजकारणात सुरू आहे.

अरुण डोंगळे हे गेली अनेक वर्षे महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’च्या राजकारणात सक्रिय होते. राधानगरी तालुक्यात त्यांनी दूध संस्थांचे जाळे विणल्याने संचालक मंडळांत त्यांचे महत्त्व होते. ‘गोकुळ’च्या २०१५ च्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र, विश्वास पाटील यांनी बाजी मारली. तीन-सव्वा तीन वर्षे पाटील यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतरही डोंगळे यांनी निकराचे प्रयत्न केले तरीही नेत्यांनी संधी न दिल्याने ते नाराज झाले. त्यानंतर महाडिक व त्यांच्यात विधानसभा निवडणुकीवरून वाजले. ‘विधानसभेला डोंगळे यांची ताकद १५ हजार मतांपुरतीच’ असे जाहीर वक्तव्य महाडिक यांनी केल्याने डोंगळे नाराज होते. डोंगळे, विश्वास पाटील व शशिकांत पाटील-चुयेकर यांनी स्वतंत्र ठराव दाखल केल्याने सत्तारूढ गटाला हादरा होता. त्यातून विश्वास पाटील यांचे मन वळविण्यात नेत्यांना यश आले. मात्र, डोंगळे यांच्या ठिकाणी पर्याय शोधण्यास सुरूवात केली. त्यामुळे डोंगळे यांचा गट अस्वस्थ होता. त्यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांना बोलावून ‘गोकुळ’ची दिशा स्पष्ट केली. त्यांचा हा निर्णय अपेक्षितच होता, मात्र, इतक्या लवकर ते पत्ते खोलतील, असे वाटत नव्हते.

‘ए. वाय.’यांना पचनी पडणार का?

डोंगळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नसला तरी त्यांची दिशा तीच आहे. राधानगरी तालुक्याच्या राजकारणात आमदार पी. एन. पाटील, उदयसिंंह पाटील-कौलवकर व ए. वाय. पाटील यांच्यात समझोता आहे. अशा परिस्थितीत आमदार पाटील यांना ए. वाय. पाटील हे अंगावर घेणार नाही. त्यामुळेच हा निर्णय त्यांच्या पचनी पडण्याची शक्यता कमी आहे.

- राजाराम लोंढे

Web Title: The role of Arun Dongle is expected; But missed the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.