रस्तेप्रश्नी प्रशासन धारेवर
By Admin | Updated: January 20, 2017 00:14 IST2017-01-20T00:14:30+5:302017-01-20T00:14:30+5:30
महापालिका सभा : कंत्राटदार-अधिकाऱ्यांत मिलीभगतचा सदस्यांकडून आरोप

रस्तेप्रश्नी प्रशासन धारेवर
कोल्हापूर : ‘नगरोत्थान’मधून ३२ कोटी ८९ लाख रुपयांचे रस्ते केले असताना त्यातील ५७ लाख रुपयांचेच रस्ते खराब झाले आहेत, असे प्रशासन म्हणत आहे. खराब झालेल्या रस्त्यांची गुणतपासणी करण्याचे काम वालचंद कॉलेजकडे असताना, नगर अभियंत्यांना एवढेच रस्ते खराब झाल्याचे ठरविण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल महासभेत गुरुवारी सदस्यांनी उपस्थित केला. या विषयावरून सदस्यांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. भूपाल शेटे यांनी हा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, ‘नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील ३२ कोटी ८९ लाख रुपयांचे रस्ते डांबरीकरण करण्यात आले. दोन वर्षांतच हे रस्ते खराब झाले; त्याबद्दल गुणतपासणी करण्यासाठी वालचंद कॉलेजच्या तज्ज्ञ समितीची नेमणूक केली. तरीही नगर अभियंता यांनी स्वत:च्या अधिकारात केवळ ५७ लाख रुपयांचेच रस्ते खराब झाले, असा अहवाल आयुक्तांना सादर केला. विशेष म्हणजे शहरात खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. तरीही प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही. यात रस्त्यांचा दर्जा खराब असल्याच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी महापालिकेचे अधिकारी कंत्राटदारांबरोबर मिलीभगत करून विषय मिटवितात. याबाबत प्रशासनातर्फे नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले की, शहरातील ६६ रस्ते नगरोत्थान योजनेतून केले आहेत. त्यांची किंमत ६ कोटी ७१ लाख आहे. नागरिक सातत्याने रस्त्यावर पाणी मारत असल्याने ते खराब होत आहेत. या उत्तराने शेटे यांचे समाधान झाले नाही. त्यांनी फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाई करावी; अन्यथा मी स्वतंत्र गुन्हा दाखल करणार असे सांगितले. बायोमेट्रिकमुळे कर्मचारी कामावर असूनही त्याची २० दिवस हजेरी लागत नाही. ही मशीन नादुरुस्त असल्याची तक्रार संतोष गायकवाड यांनी केली. ही मशीन योग्य रीतीने सुरू असल्याचे प्रशासनातर्फे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यावर आक्रमक होत गायकवाड यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवावे, अशी मागणी केली. ही मागणी सभागृहानेही (हॅलो ३ वर) श्वेतपत्रिका काढा महापालिकेच्या दृष्टीने कुठले काम चांगले आहे, हे सभागृहाला दाखवा, अशी मागणी नगरसेवक सुनील कदम यांनी केली. यात त्यांनी प्रत्येक विभागाचा प्रमुख काय करतो?, रंकाळा तलावाची दुरवस्था आहे. संरक्षक कठडे नाहीत म्हणून माणसे मरत आहेत. पूल पडत आहेत. स्मशानभूमीमध्ये लाकडे नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग आहे. या सर्व प्रश्नांवर आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी कदम यांनी केली. ...यांचाही गौरव : ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी लोगो तयार करणारे अनंत खासबारदार यांचा, तर इराणी खणीत बाप-लेकीसह बुडालेली गाडी काढणारे धाडसी सुनील कांबळे व पाणीपुरवठा विभागाकडे रोजंदारीवर २५ वर्षे काम करणारे रमेश सरनाईक, रंकाळा तलावात आत्महत्या करणाऱ्या शालन भंडारे या महिलेस वाचविल्याबद्दल अग्निशमन दलाचे जवान भगवान शिंगाडे, तर जयदीप पाटणे, प्रसाद पोवार, वैभव ठाकर (तिघांची राष्ट्रीय कि क बॉक्सिंगमध्ये चमकदार कामगिरी), विशाल पाटील (राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड), विशाल भाले (राज्य हॉकी संघात निवड), भार्गव कांबळे (ढोलकी बोलकी स्पर्धेत यश), शैलजा कोसंबी (आदर्श माता), तौफिक मुल्लाणी (चेंबर्स सदस्य निवड) यांचा सत्कार महापौर हसिना फरास यांच्या हस्ते झाला. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, आदी उपस्थित होते. हे ठराव मंजूर झाले ताराबाई पार्कातील सासने मैदान केवळ खेळासाठी राखीव ठेवा महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थानमधून २०१६-१७ या वर्षातील ४.४१ कोटींच्या कामांना मंजुरी सीमाभागातील मराठी भाषिकांवर झुंडशाहीचा निषेध फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेने कारवाई करावी; अन्यथा मी स्वतंत्र गुन्हा दाखल करणार, असे भूपाल शेटे यांनी सांगितले.