रस्ता ‘शंभर फुटी’, खड्डे दीड फुटी
By Admin | Updated: November 10, 2014 23:57 IST2014-11-10T23:52:19+5:302014-11-10T23:57:31+5:30
चार प्रभागांत अडकला रस्ता : नगरोत्थान योजनेच्या मलमपट्टीमुळे खड्डे पाचविलाच

रस्ता ‘शंभर फुटी’, खड्डे दीड फुटी
कोल्हापूर : खड्डे, धुळीचे साम्राज्य असा असलेला भाग म्हणजे मंगळवार पेठ-यल्लमा मंदिर-सुभाषनगर चौकापर्यंतचा रस्ता होय. हा रस्ता या चार प्रभागांत अडकला आहे. त्यातच महापालिका प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे.
सतत वर्दळीचा व दाट लोकवस्तीचा असलेला जवाहरनगर, नेहरूनगर, सुभाषनगर भाग होय. या भागात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पण गेल्या दहा ते १५ वर्षांपासून या भागाचा विकास झाला नाही. या रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढण्यात प्रशासन उदासीनता दाखवीत आहे. तसेच रस्त्याकडेला असलेल्या गटारी बुजल्यामुळे पाणी रस्त्यावर येते. त्यातच रस्त्यावरील धूळ व अस्वच्छतेमुळे नागरिक वैतागले आहेत. मंडलिक रस्त्याकडून यल्लमा मंदिराकडे निघालेला हा रस्ता कागदावर शंभर फुटी आहे; पण तो प्रत्यक्षात शंभर फुटी झालेला नाही. सुभाषनगर रस्त्यावर यापेक्षा वेगळी स्थिती नाही. या रस्त्यावर मोठमोठे दगड व खड्डे आहेत. त्यांमुळे अपघात होण्याचा धोका संभव आहे. हा रस्ता शास्त्रीनगर, जवाहरनगर, नेहरूनगर, संभाजीनगर व स्वातंत्र्यसैनिक वसाहत या चार प्रभागांत अडकला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
‘नगरोत्थान’मधील रस्ता असूनही निकृष्ट
हा रस्ता नगरोत्थान योजनेमधून सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. रस्त्याला डांबर लागलेले नाही. केवळ मोठी खडी टाकून त्यावर तात्पुरती मलमपट्टी केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वाहतुकीची कोंडी
दर मंगळवारी व शुक्रवारी यल्लमा मंदिरात भाविकांची गर्दी होते. या मंदिराकडून शाहू सेना चौकापर्यंतचा रस्ता खराब आहे. यामधून वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे हा रस्ता नवीन करावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.