नदी उशाला, तरीही भटकंती चारी दिशांना
By Admin | Updated: December 22, 2015 00:58 IST2015-12-22T00:22:51+5:302015-12-22T00:58:52+5:30
ग्रामस्थांची पळापळ : प्रदूषण कमी करण्याऐवजी दुसरीकडून पाणी आणण्यास प्राधान्य -पंचगंगा काढ मरणाची वाट

नदी उशाला, तरीही भटकंती चारी दिशांना
अतुल आंबी - इचलकरंजी -गेली कित्येक वर्षे पंचगंगा नदीकाठ व परिसरातील अनेक गावे पंचगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरत होती. मात्र, प्रदूषणामुळे ही गावे आता कृष्णा, दूधगंगा, वारणा अशा अन्य नद्यांतून पाणी योजना आणण्यासाठी धावाधाव करीत आहेत. शासनही अशा योजनांसाठी करोडो रुपये निधी देत असून, पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. अन्य नद्यांमधून पिण्यासाठी आणलेले हे पाणी सांडपाण्याच्या रूपाने पुन्हा पंचगंगा नदीमध्येच सोडले जात असल्याने भविष्यात पंचगंगा नदी एक मोठा नाला बनून राहील काय? अशी भीती व्यक्त होत आहे.
पंचगंगा नदी ज्या-ज्या गावांमधून गेली आहे, त्या गावांबरोबरच परिसरातील काही किलोमीटर अंतरावर असणारी गावेही पंचगंगा नदीतून पिण्यासाठी पाणी वापरत होती. या गावांनी संयुक्तपणे योजना राबवून पिण्यासाठी पाणी नेले होते. मात्र, नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याने अशा पाणीपुरवढा योजना बंद पडल्या. त्या सुरू करण्याऐवजी या गावांनी पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी २०-२५ किलोमीटर दूर असलेल्या अन्य नद्यांमधून पाणी आणण्याचे नियोजन केले. अनेक गावांनी करोडो रुपयांच्या विविध योजनांच्या माध्यमातून कृष्णा, दूधगंगा, वारणा या नद्यांमधून पाणी आणले आहे. काही गावांचे प्रस्ताव तयार असून, त्यांचेही नियोजन सुरू आहे.
पाणी योजनांत त्रुटी
अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी अन्य नद्यांमधून योजना राबवून पाणी आणले असले तरी अनेक त्रुटी व कारणांमुळे कित्येक वेळा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. चार-आठ दिवस गावाला पाणी मिळत नाही आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची सवय मोडल्यामुळे अशावेळी ‘नदी उशाला कोरड घशाला’ या म्हणीप्रमाणे गावांना अनुभव येताना दिसत आहे.
रुकडी (ता. हातकणंगले) या गावाला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो, तर दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणीच येत नाही. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे असे घडते. तसेच दूषित पाण्यामुळे अतिसार, उलटी, टायफॉईड, कॉलरा या प्रमुख आजारांसह पोटाच्या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.
- डॉ. राजकुमार पाटील
पंचगंगा नदीवरील बंद पडलेल्या योजना
रुई येथील बंधाऱ्यावरून चौदा गावांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. यामध्ये तारदाळ, आळते, यड्राव, कोरोची, कबनूर, साजणी, तिळवणी, खोतवाडी, मजले, हातकणंगले या गावांचा समावेश होता.
नदीपलीकडे पाच गावांची पाणीपुरवठा योजना होती. त्यामध्ये पट्टणकोडोली, तळसंदे, यळगूड, रेंदाळ, हुपरी गावांचा समावेश होता.
याशिवाय नदीकाठच्या अनेक गावांनी ग्रामपंचायत स्तरावर थेट पंचगंगा नदीतून उपसा करून पाणीपुरवठा योजना राबविल्या होत्या. त्यापैकी बहुतांश बंद पडल्या असून, काही ऐनवेळची सोय म्हणून वापरल्या जात आहेत.
या गावांनी वारणा व दूधगंगेतून आणले पाणी
यड्राव, तारदाळ, हातकणंगले, आळते, कोरोची, खोतवाडी, मजले, टाकवडे, हुपरी, रेंदाळ, तामगाव, वसगडे, उचगाव, गडमुडशिंगी, कुरुंदवाड, हेरवाड, शिरोळ, कोंडिग्रे, जांभळी अशा अनेक गावांनी वारणा, कृष्णा व दूधगंगा या नद्यांमधून पिण्यासाठी पाणी आणले आहे.