वाढत्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी हादरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:08+5:302021-02-05T07:07:08+5:30

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी पुन्हा हादरली आहे. एका महिन्यात ३, ...

Rising crime shook the city of Vastra | वाढत्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी हादरली

वाढत्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी हादरली

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे वस्त्रनगरी पुन्हा हादरली आहे. एका महिन्यात ३, तर गेल्या तीन महिन्यांत ५ खून झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा व कायद्याचा धाक कमी झाल्याची भावना शहरवासीयांतून व्यक्त होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे मोठे आव्हान नूतन पोलीस अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, अन्यथा वस्त्रनगरी पुन्हा क्राईम नगरी बनण्यास वेळ लागणार नाही.

वस्त्रोद्योगनगरीत देशभरातील विविध राज्यांतून नागरिक कामानिमित्त येऊन राहिले आहेत. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, हळूहळू गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आपले प्रस्थ वाढवत गुन्हेगारी टोळ्या तयार करून दहशत निर्माण करू लागले. त्याचे प्रमाण वाढत जाऊन मागील काही वर्षांत खून, खंडणी, प्राणघातक हल्ला, मारामारी, लूटमार अशा गंभीर घटना घडू लागल्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिस्तूल पोहोचवणारे तस्कर, मटकाकिंग, ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगार, असे गुन्हेगारी प्रस्थ वाढत गेले. अवैध व्यवसायात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून करणे, त्याचा बदला घेण्यासाठी पुन्हा खून, असे सत्र वाढले. बघता-बघता वस्त्रनगरी क्राईम नगरी बनली. त्याचा येथील उद्योगांवरही विपरीत परिणाम होऊ लागला. वस्त्रोद्योगातील विविध कारखाने, त्यातील काम (खाते) घेण्यासाठी दादागिरी, हाणामारी, दहशत असे प्रकार घडू लागले.

या सर्वांवर वचक निर्माण करत यापूर्वीचे आयपीएस अधिकारी एस. चैतन्य व मानसिंह खोचे त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत धाक ठेवला. दोन्ही वेळच्या अधिकाऱ्यांची कामाची पद्धत वेगवेगळी असली तरी शहर व परिसरातील गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्यात त्यांना यश आले होते. त्यातून शहरातील तब्बल १६ टोळ्यांना मोक्का लावून त्यातून सुमारे ९६ जण तुरुंगात आहेत. प्रमुख गुन्हेगारी टोळ्या व त्यांचे म्होरके आत असल्याने शहरात शांतता प्रस्थापित झाली होती; परंतु अलीकडे पुन्हा दुसऱ्या फळीतील गुन्हेगार आपले वर्चस्व निर्माण करत डोके वर काढत असल्याचा प्रकार सुरू आहे. दत्तनगर परिसरातील एका अल्पवयीनच्या टोळीतील काही सदस्य आजही त्या परिसरात आपली दहशत ठेवून आहेत. त्यामुळे गुन्हेगारांपेक्षा पोलिसांना आपला धाक वाढवावा लागणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी नूतन अधिकाऱ्यांनी वचक निर्माण करण्याची गरज आहे.

चौकट

अधिकारी बदलले आणि गुन्हेगारी वाढली

शहर परिसरात गेल्या तीन महिन्यांत पाच खून झाले. त्यातील एक अद्याप उघडकीस आला नाही. त्याचबरोबर खंडणी, कारखान्यात घुसून मारहाण, चोऱ्या, घरफोड्या याचेही प्रमाण वाढले. मटका व गुटख्यावरही कारवाया सुरू आहेत; परंतु नियंत्रण नाही. या सर्व प्रकारामुळे शहरातील प्रमुख पोलीस अधिकारी बदलले आणि पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून नूतन अधिकाऱ्यांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आपला धाक निर्माण करणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Rising crime shook the city of Vastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.