शौचालय अनुदानावरून गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:39+5:302021-01-13T04:59:39+5:30
कसबा बावडा : तालुक्यातील ११८ गावांपैकी फक्त ४० गावांतील शौचालय अनुदानाचे प्रस्ताव मंजूर होतात, तर सदस्यांनी नावे दिलेल्या ...

शौचालय अनुदानावरून गदारोळ
कसबा बावडा : तालुक्यातील ११८ गावांपैकी फक्त ४० गावांतील शौचालय अनुदानाचे प्रस्ताव मंजूर होतात, तर सदस्यांनी नावे दिलेल्या लाभार्थ्यांची शौचालय अनुदानाची यादी का मंजूर होत नाही, काही प्रस्ताव मुद्दाम फेटाळले जातात, या कारणांवरून करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला, तर शौचालय खरोखरच बांधले असेल तर त्यालाच अनुदान द्या, या उपसभापती सुनील पोवार यांच्या वक्तव्याने या गदारोळात आणखीनच भर पडली. पंचायत समितीमध्ये सभापतींना माहिती न देता काही कार्यक्रम परस्पर घेतले जातात. ते येथून पुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सभापती अश्विनी धोत्रे यांनी दिला.
करवीर पंचायत समितीची मासिक सभा सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी सभापती अश्विनी धोत्रे होत्या. यावेळी उपसभापती सुनील पवार गटविकास अधिकारी जयवंत उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत बांधकाम, शिक्षण, आरोग्य विभागाला धारेवर धरण्यात आले.
काही गावांचे शौचालय मागणीचे प्रस्ताव पंचायतीकडे पाठवण्यात आले आहेत; पण ते अद्याप मंजूर झालेले नाहीत. त्यामुळे आम्ही सदस्यांनी लोकांना उत्तर काय द्यायचे, असा सवाल सागर पाटील यांनी उपस्थित केला. इंद्रजीत पाटील, चंद्रकांत पाटील, यांनी पुराच्या काळात अनेकांच्या घरांची पडझड झाली. मात्र, त्यांना अद्याप शौचालय अनुदान मिळालेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. विजय भोसले, अविनाश पाटील, मोहन पाटील यांनी हाच विषय बराच वेळ उचलून धरला. राजेंद्र सूर्यवंशी यांनी विनाकारण कोण तरी शौचालयाचे अनुदान तटवत असेल तर हा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. यावर उपसभापती सुनील पोवार यांनी शौचालयाचे बांधकाम बघितल्याशिवाय पंचायतीने कोणालाही अनुदानाचे पैसे अदा करू नयेत, असे स्पष्ट केले. तर गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी सदरचे प्रस्ताव ऑनलाइन लिंक होत असल्याचे स्पष्ट केले.
पंचायत समितीमध्ये विविध कार्यक्रम होत असतात. मात्र, अलीकडच्या काळात काही सदस्य पंचायतमध्ये परस्पर कार्यक्रम घेतात. त्याची माहिती प्रोटोकॉलप्रमाणे सभापती यांना देणे आवश्यक असताना ती दिली जात नाही. वर्तमानपत्रात बातम्या आल्या. नंतरच पंचायतीमध्ये कार्यक्रम झाल्याचे समजते. त्यामुळे येथून पुढे असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सभापती अश्विनी धोत्रे यांनी दिला. तर असला प्रकार चुकीचा असल्याचे प्रदीप झांबरे यांनी स्पष्ट करून सदस्यांनी प्रोटोकॉल पाळावा, अशी सूचना केली. सभापतींच्या या रुद्रावतारावर अनेक सदस्यांनी आपली मते मांडली.
चौकट
मुडशिंगी गावात पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत २०१७ ला एका लाभार्थ्यांना ३० हजारांचे घरकुल अनुदान मंजूर होऊन त्यांना पहिला हप्ता देण्यात आला होता. आता या लाभार्थ्यांचे निधन झाले असून त्यांचा घरकुलाचा प्रस्ताव रद्द करून त्यांची वसुली त्यांच्या सूनबाईकडून पंचायतीने नोटीस पाठवून सुरू केली आहे. अशी अन्यायकारक वसुली योग्य आहे का? असा सवाल प्रदीप झांबरे यांनी विचारला. ६० वर्षांवरील नागरिकांना पेन्शनसाठी वयाचा दाखला सांगरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळावा, अशी मागणी अर्चना खाडे व सविता पाटील यांनी केली. तर तालुक्यातील कुपोषित बालके सक्षम कधी होणार, असा सवाल विजय भोसले यांनी केला. अंगणवाडी सेविकांचा पगार वेळेवर का होत नाही, असा सवाल सागर पाटील यांनी उपस्थित केला. अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत का नाही, असा सवाल अविनाश पाटील यांनी केला. कोल्हापूर- घुंगरूवाडी- हसून एसटी सुरू करण्याची मागणी विजय भोसले, सविता पाटील, अश्विनी खाडे यांनी केली.
चौकट: शाळा सुरू करा...
खूप महिने झाले आता शाळा केव्हा सुरू होणार, असा सवाल चंद्रकांत पाटील, अर्चना खाडे, सविता पाटील यांनी उपस्थित केला. सभापती अश्विनी धोत्रे यांनी सर्व प्रोटोकॉल पाळून मुख्याध्यापकांची एक बैठक घेऊन याबाबत निर्णय घेऊ या, असे आश्वासन दिले.