पानसरेंच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस
By Admin | Updated: February 23, 2015 00:16 IST2015-02-23T00:05:41+5:302015-02-23T00:16:14+5:30
कोल्हापूर पोलिसांकडून जाहीर

पानसरेंच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्यभरातील अनुभवी तपास अधिकारी आठ दिवस कोल्हापुरात तळ ठोकून आहेत; परंतु हत्येसंबंधीचा धागादोरा त्यांच्या हाती न लागल्याने तपासात प्रगती झाली नसल्याने पोलिसांच्या विरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, पानसरे यांची हत्या करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस कोल्हापूर पोलिसांनी जाहीर केले आहे.
पानसरे यांची झालेली हत्या ही सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का? त्यापासून कोणी दुखावलं होतं का, अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी या सर्व पातळ्यांवर माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. तथापि, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही. या घटनेतील वस्तुस्थिती जखमी उमा पानसरे यांच्या जबाबातूनच समोर येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रुग्णालयात जाऊन उमा पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत जबाब घेण्याचा व मारेकऱ्यांचे रेखाचित्र दाखविण्याचा प्रयत्न केला; परंतु डॉक्टरांनी त्या धक्क्यातून सावरल्या नसल्यामुळे काही बोलणार नाहीत. थोडा वेळ द्या, त्यानंतर त्या सर्व माहिती देतील, असे सांगितले. त्यामुळे त्यांचा जबाब झालेला नाही. तपासात अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारी म्हणून पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत.
पोलिसांनी दोनशेहून अधिक जणांकडे चौकशी केली तसेच यापूर्वी पिस्तूल तस्कर मनिष नागोरी, आरसी गँगसह गारगोटी व सांगली येथील ३५ पेक्षा जास्त गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत पोलिसांना संशयास्पद काही आढळले नाही. उपस्थित होणाऱ्या शक्यतांचा अभ्यास करून तपासाची पुढील दिशा ठरविली जात असल्याचे पोलीस सांगत आहेत.
संशयास्पद मोटारसायकलीच्या फोटोने खळबळ
अॅड. पानसरेंवर गोळीबार झाला, त्यादिवशी कोल्हापूरमधील रिंग रोडवरील रस्त्यावरच्या विभाजकावर आदळलेल्या संशयास्पद मोटारसायकलीचे फोटो रविवारी वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी बेवारस स्थितीत मिळून आलेल्या मोटारसायकलींची चौकशी केली असता त्यांचा हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.