कळंब्यात जैवविविधतेचे पुनरुज्जीवन
By Admin | Updated: July 23, 2016 00:52 IST2016-07-23T00:50:38+5:302016-07-23T00:52:59+5:30
जैवविविधता समितीचा निर्णय : तलावातील पाणी वाहून जाऊ नये, यासाठी बंधाऱ्यात बरगे घालण्याचे आदेश--लोकमतचा प्रभाव

कळंब्यात जैवविविधतेचे पुनरुज्जीवन
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या जैवविविधता समितीची पहिली बैठक शुक्रवारी महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. यंदा कळंबा तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याने त्यामधील संपूर्ण जैवविविधता उदाहरणार्थ मासे, कासव, शिंपला, पाणवनस्पती नष्ट झाल्या आहेत. आता पावसाळ्यात कळंबा तलाव पुन्हा तुडुंब भरल्याने जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महापौर अश्विनी रामाणे यांनी समितीमार्फत वर्षभरात एखादे चांगले काम करून दाखवूया, असे सांगून कळंबा तलावातील वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी बंधाऱ्यात बरगे (फळ्या) घालण्याचे आदेश दिले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी जैवविविधता कायद्याप्रमाणे या विषयाची नोंदवही करण्याचे व शहरातील जैवविविधतेने समृद्ध ठिकाणे निश्चितीचे आदेश दिले.
गटनेते शारंगधर देशमुख यांनी परताळा व रंकाळा तलावांतील मासेमारीच्या न काढलेल्या जाळ्यांचा विषय उपस्थित केला. तसेच रंकाळ्यातील पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस थांबल्याने आता ते अडविण्यात यावे; अन्यथा पाणी पातळी जलदगतीने कमी होईल, असे त्यांनी सांगितले. सत्यजित कदम यांनी मत्स्यबीजांसह मासेमारीचा ठेका देण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली. विजय सूर्यवंशी यांनी शहरात इतरही तलाव आहेत; त्यांचा डीपीआर तयार करण्यात यावा, अशी सूचना मांडली. सूरमंजिरी लाटकर यांनी पक्षांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याबरोबरच वादळात न पडणाऱ्या जातींचे वृक्षारोपण करण्याची सूचना केली. जैवविविधता समितीचे सदस्य अमर जाधव यांनी माशांच्या विविध जातींची माहिती दिली.
यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, अनिल चौगुले, डॉ. नीलिशा देसाई,डॉ. डी. एस. पाटील, बाळासाहेब कांबळे, उपवनसंरक्षक कार्यालयाचे देवदास खडके, आर. के. पाटील, प्रतिभा राजेभोसले, आदी उपस्थित होते.
शासनाकडून निधीसाठी प्रयत्न व्हावा
उदय गायकवाड यांनी जैवविविधता समितीचे महत्त्व, गरज व उद्देश यांबद्दल सविस्तर माहिती देऊन शासनाकडून निधीसाठी प्रयत्न करता येईल, असे सांगितले. तसेच कळंबा तलावात विविध जातींचे मासे, कासव, खेकडे, शंख, शिंपले सोडण्याची गरज आहे. यासाठी मत्स्यबीज विभागाशी पत्रव्यवहार करून विविध प्रकारचे मासे तलावात सोडण्यात यावेत व मासे सोडल्यानंतर एक वर्ष मासेमारीसाठी बंदी घालण्यात यावी, अशी सूचना केली.