राज्यातील ४३ लाख कृषिपंपाच्या वीजबिलांची फेरपडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:59+5:302021-01-25T04:24:59+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारने लागू केलेले नवे वीज जोडणी धोरण व वीजबिल सवलत योजना यांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील सर्व ४३ ...

राज्यातील ४३ लाख कृषिपंपाच्या वीजबिलांची फेरपडताळणी
कोल्हापूर : राज्य सरकारने लागू केलेले नवे वीज जोडणी धोरण व वीजबिल सवलत योजना यांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील सर्व ४३ लाख कृषिपंप ग्राहकांच्या बिलांची फेरपडताळणी होणार आहे. त्यातील चुकीची बिले दुरुस्त करुनच सवलतीप्रमाणे बिलांची वसुली होईल, असा निर्णय इरिगेशन फेडरेशन व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येत्या तीन वर्षात दिवसा वीज देण्याची योजना पूर्णत्वास जाईल, असेही ठरले. वीजबिले दुरुस्त झाली तर शेतकरी योजनेत सहभागी होतील व संघटनाही राज्य सरकारला सहकार्य करेल, अशी खात्री यावेळी देण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्या संयुक्त शिष्टमंडळासमवेत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार राजू शेट्टी, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील भुयेकर, विक्रांत पाटील, आर. जी. तांबे, मुकुंद माळी, भरत अग्रवाल, जे. पी. लाड यांच्यासह महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
नव्या वीज जोडणी धोरणांतर्गत जाहीर केलेल्या ५० टक्के वीजबिल सवलतीच्या निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात आले. तथापि ही योजना पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी दोन महत्त्वाच्या त्रुटींचे निराकरण होणे आवश्यक आहे, हे निदर्शनास आणून देण्यात आले. राज्यातील ८० टक्केहून अधिक शेतीपंपांची वीजबिले सरासरीने दुप्पट वा अधिक आलेली आहेत. विनामीटर शेतीपंपांचा जोडभार वाढवला आहे. मीटर असलेल्या व मीटर चालू नसलेल्या शेतीपंपांचे वीजबिल मीटर रिडींग न घेता, सरासरी म्हणून १०० ते १२५ युनिट्स म्हणजे दुप्पट वा अधिक टाकले जात आहे. मीटर बंद असलेले लाखो ग्राहक आहेत, त्यांच्यावरही सरासरी १०० ते १२५ युनिट्ची आकारणी होत आहे.
चौकट ०१
वीजबिल चुकीचे व जास्त आहे, अशी सर्व ग्राहकांनी महावितरणच्या लिंकमध्ये योग्य पर्यायाची नोंद केली तरच स्थळ तपासणी होईल आणि बिल दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरुकपणे याठिकाणी तक्रार नोंदवावी व स्थळ तपासणीच्या वेळी समक्ष हजर राहून व संपूर्ण माहिती देऊन आपले बिल पूर्णपणे दुरुस्त करुन घ्यावे व मगच योजनेत सहभागी होण्यास मान्यता द्यावी, असे जाहीर आवाहन सर्व संघटनांच्यावतीने सर्व शेतीपंप वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.
चौकट ०२
अशा करा दुरुस्त्या
वाढलेली बिले दुरुस्त करण्यासाठी जेथे विनामीटर जोडणी आहे, तेथे खरा जोडभार तपासून त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर आहेत व सुरु आहेत, तेथे प्रत्यक्ष रिडींग घेऊन त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. मीटर बंद आहेत, अशाठिकाणी मागील मीटर चालू कालावधीतील वीज वापर गृहीत धरून त्यानुसार संपूर्ण कालावधीचा वीजवापर व त्यानुसार बिले दुरुस्त करावीत. जेथे मीटर पूर्ण काळ बंद आहे व प्रत्यक्ष वीजवापर तपासता येत नाही, अशाठिकाणी त्या फिडरवरुन दिलेली वीज व त्या फिडरवरील खरा जोडभार या आधारे सरासरी वीजवापर व त्यानुसार बिले निश्चित करण्यात यावीत, अशा मागण्या संघटना प्रतिनिधींच्यावतीने करण्यात आल्या. या सर्व मागण्यांना ऊर्जामंत्री व संबंधित अधिकारी यांनी मान्यता दिली.