जात सर्वेक्षणाची पुनर्पडताळणी १६ ला
By Admin | Updated: February 7, 2015 00:28 IST2015-02-07T00:27:44+5:302015-02-07T00:28:11+5:30
इचलकरंजी नगरपालिका : ८२ दिवसांत अंतिम यादी प्रसिद्ध होणार

जात सर्वेक्षणाची पुनर्पडताळणी १६ ला
इचलकरंजी : सन २०११ मधील जनगणनेमध्ये करण्यात आलेल्या आर्थिक, सामाजिक व जात सर्वेक्षणातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाच्यावतीने पुनर्पडताळणी होणार असून, त्याची अंतिम यादी ८२ दिवसांत तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांची त्याबाबतची एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवारी येथे पार पडली.या कार्यशाळेत अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार म्हणाल्या, शहरी भागात असलेल्या नगरपालिकांमध्ये संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी या सर्वेक्षणातील पुनर्पडताळणीचे काम पाहण्याचे आहे. जनगणनेमध्ये असलेली प्रारूप यादी १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच यादीवर २५ फेब्रुवारीला होणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. सभेमध्ये सूचविण्यात येणाऱ्या सूचनांची फेर चौकशी करून त्याचा समावेश यादीमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, १६ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीमध्ये प्रारूप यादीसंदर्भात नागरिकांकडून दावे व आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. हे दावे व आक्षेप यांची सुनावणी मुख्याधिकाऱ्यांसमोर किंवा संबंधित नेमलेल्या अधिकाऱ्यांसमोर होऊन ८ एप्रिलला या सुनावणीचा पहिला निकाल घोषित होईल.
सुनावणीच्या पहिल्या निकालानंतर पुन्हा दावे व आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येणार असून, त्याबाबतची सुनावणीसुद्धा मुख्याधिकाऱ्यांसमोर किंवा संबंधित नेमलेल्या अधिकाऱ्यांसमोर होणार आहे. एकूण प्रक्रियेच्या ८२ व्या दिवशी ही अंतिम यादी तयार होणार आहे. एकूणच या प्रक्रियेबाबतचे मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये करण्यात आले. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. हे मार्गदर्शन कुरुंदवाडचे मुख्याधिकारी अतुल पाटील व जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरणाचे डॉ. निर्मळे यांनी केले. इचलकरंजीसाठी १ ते १८ वॉर्डांकरिता अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांची, तर १९ ते २५ वॉर्डांसाठी उपमुख्याधिकारी श्रीराम गोडबोले यांची सुनावणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
'अनधिकृत फलकांसाठी टोल फ्री दूरध्वनी
शहरामध्ये नगरपालिकेच्यावतीने विविध ठिकाणी डिजिटल फलक व होर्डिंग्ज लावण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्याबाबत अधिकृत मक्तेदार नेमण्यात आले आहेत. याशिवाय अनधिकृत फलक, होर्डिंग्ज किंवा बॅनर लावले जातात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते, तर फलकांवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे प्रसंगी वाद होतो. असे अनधिकृत फलक, होर्डिंग्ज,
बॅनर हटविण्यासाठी नगरपालिकेच्या १८०० २३३ १२१७ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी माहिती दिल्यास पालिका योग्य ती कारवाई करेल, असे आवाहन अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी केले आहे.