‘डॉल्बीबंदी’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद-- आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !
By Admin | Updated: May 29, 2015 00:05 IST2015-05-28T22:02:38+5:302015-05-29T00:05:02+5:30
एक पाऊल बदलाचे : दोन गावांनी घेतला ‘डॉल्बीमुक्त गावा’चा ध्यास; गावोगावी बैठकां--‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीमुळे गावागावांतील लोकांची मानसिकता बदलू लागली आहे.

‘डॉल्बीबंदी’च्या आवाहनास भरभरून प्रतिसाद-- आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !
अकरा वर्षांत पहिल्यांच होणार डॉल्बीशिवाय विवाहसोहळा
आदर्की : येथील श्री भैरवनाथ उद्योग समूहातर्फे गेल्या अकरा वर्षांपासून सर्वधर्मीय बिगरहुंडा सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन केले जाते. हजारो वऱ्हाडमंडळींच्या साक्षीने नवरदेवाची मिरवणूक डॉल्बी वाजवून काढली जाते. ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा दि. ३० रोजी होणारा सामुदायिक विवाहसोहळा अकरा वर्षांत प्रथमच डॉल्बीशिवाय होणार असल्याचा निर्णय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कासार व संचालक मडळाने घेतला आहे.
आदर्की, ता. फलटण येथे भैरवनाथ उद्योग समूह व शासनाच्या शुभमंगल योजनेअंतर्गत सामुदायिक विवाहसोहळा घेतला जातो. यामध्ये नवरदेवाची सजविलेल्या ट्रॉलीतून डॉल्बीच्या दणक्यात मिरवणूक काढली जात होती. यावर्षी विवाहसोहळ्याचे हे बारावे वर्ष असून यंदा २२ विवाह पार पडणार आहेत. हा सोहळा डॉल्बीमुक्त होणार आहे. (वार्ताहर)
सातारा : भुर्इंजच्या धर्तीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी डॉल्बीबंदीचा पर्याय स्वीकारावा, यासाठी ‘लोकमत’ने आवाहन केले आहे. सर्वच तालुक्यांमधून या आवाहनास सकारात्मक पाठिंबा मिळत असून अनेक गावांनी या विषयावर बैठका बोलावल्या आहेत. काही गावांनी तर निर्णयही जाहीर केला आहे. तरुणानांना अनेक अर्थांनी हलायला लावणाऱ्या डॉल्बीमुळं घरांच्या भिंतीही हादरून कमकुवत बनतात, हे वास्तव पटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे डॉल्बीमुक्त गावासाठी एक पाऊल पुढे आली आहेत.
‘लोकमत’ने डॉल्बीबंदीची लोकचळवळ निर्माण केली आहे. या चळवळीचा भाग बनून आम्ही यावर्षीपासून बाळासाहेब कासार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉल्बीमुक्त विवाहसोहळा पार पाडणार आहे. या सोहळ्यास हजारोंच्या संख्येन लोक उपस्थित असतात. अबालवद्धांना तसेच गावाला डॉल्बीच्या दुष्परिणामांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे.
- प्रकाश येवले,
आदर्की बुद्रुक
गुळुंब गावात डॉल्बीबंदीचा निर्णय...
वाई : पुणे-बेंगलोर महामार्गावर वेळे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर गुळुंब गाव आहे. चांदक-गुळुंब ओढाजोड प्रकल्पामुळे या गावाची ओळख राज्यभर झाली आहे. राज्यपाल व अनेक मान्यवरांनी गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन येथील एकीचे व लोकसहभागाचे कौतुक केले आहे. गावात शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत. आता गावकऱ्यांनी ‘लोकमत’ने सुरु केलेल्या लोकचळवळीत सहभागी होऊन गावात डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे.
विवाहसोहळ्याला आधुनिक स्वरूप आले आहे. हा सोहळा आनंददायी होण्यासाठी अमाप पैसे खर्च केले जातात. धूमधडाक्यात लग्न व्हावे, यासाठी डॉल्बी वाजविली जाते.
मात्र, डॉल्बीच्या तालावर ठेका धरणाऱ्या तरुणांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढू लागले आहे. डॉल्बी लावली तरच लग्नाच्या वरातीत सहभागी होणार, असा हट्ट धरला जातो. लग्नाची वरात निघते तीही रात्री उशिरा अख्खं गाव झोपलं असताना. या वरातीत वधू-वर आणि डॉल्बीच्या तालावर नाचणारे काही हौशी युवक. डॉल्बीवर कर्कश आवाजातील गाणी वाजवून अख्ख्या गावाला वेठीस धरले जाते. मात्र, गावकरी निमूटपणे त्रास सहन करतात.
पण... ‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीमुळे गावागावांतील लोकांची मानसिकता बदलू लागली आहे. भुर्इंजप्रमाणेच आपलेही गाव डॉल्बीमुक्त करण्यासाठी गुळुंबच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर)
लोकसहभागातून गावात आजपर्यंत अनेक चांगली कामे उभी राहिली आहेत. गाव करील ते राव काय करणार, या म्हणीप्रमाणे सर्वांनाच त्रासदायक ठरणारी डॉल्बी बंद करण्याचा निर्णय गावाने घेतला आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार आहे.
- अल्पना यादव,
सरपंच, गुळुंब