पुनर्वसन प्रश्न समन्वातून सोडवा, मंत्री मुश्रीफ यांची महापालिका व फेरीवाल्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 17:54 IST2021-02-15T17:51:52+5:302021-02-15T17:54:04+5:30
Hasan Mushrif Muncipal Corporation Kolhapur- कोणाचे नुकसान होणार नाही आणि कोणाला अडथळाही होणार नाही अशा पद्धतीने संयुक्तपणे पाहणी करून फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा, तसेच फेरीवाला धोरण कशा पद्धतीने राबवायचे यासंबंधी प्रशासक व फेरीवाला कृती समितीने समन्वयातून मार्ग काढावा, अशी सूचना सोमवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या मनपा अधिकारी आणि फेरीवाला कृती समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

पुनर्वसन प्रश्न समन्वातून सोडवा, मंत्री मुश्रीफ यांची महापालिका व फेरीवाल्यांना सूचना
कोल्हापूर : कोणाचे नुकसान होणार नाही आणि कोणाला अडथळाही होणार नाही अशा पद्धतीने संयुक्तपणे पाहणी करून फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा, तसेच फेरीवाला धोरण कशा पद्धतीने राबवायचे यासंबंधी प्रशासक व फेरीवाला कृती समितीने समन्वयातून मार्ग काढावा, अशी सूचना सोमवारी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या मनपा अधिकारी आणि फेरीवाला कृती समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
गेल्या आठ दिवसांपासून शहरात फेरीवाले विरुद्ध महापालिका प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत फेरीवाले कृती समितीचे पदाधिकारी पालिकेच्या कारवाईवरून संतप्त झाले होते. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालेली नाही, फेरीवाल्यांनी कोठे बसायचे, फेरीवाला झोन कोणते हेच ठरले नाही तर मग कारवाई कसली करता? असा सवाल आर. के. पोवार यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना विचारला.
दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांनी आर. के. पोवार यांच्यासमवेत ताराबाई रोड व महाद्वाररोडवर जाऊन संयुक्त पाहणी करा, पट्टे मारून घ्या. समन्वयातून मार्ग काढा असे सांगितले. बैठकीस आमदार चंद्रकांत जाधव, दिलीप पवार, महंमद शरिफ शेख, रघुनाथ कांबळे, अशोक भंडारे, राजू जाधव, किशोर घाडगे उपस्थित होते.