पॉपलीन कापड उत्पादक व अडते यांच्यातील प्रश्नांवर तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:45+5:302021-01-21T04:23:45+5:30
बैठकीत एकमत इचलकरंजी : कापड डिलिव्हरी पेमेंटधारा तीन दिवसांची करणे. तसेच मध्यंतरीच्या काळात २६ रुपये प्रतिमीटर दराने कापड विक्री ...

पॉपलीन कापड उत्पादक व अडते यांच्यातील प्रश्नांवर तोडगा
बैठकीत एकमत
इचलकरंजी : कापड डिलिव्हरी पेमेंटधारा तीन दिवसांची करणे. तसेच मध्यंतरीच्या काळात २६ रुपये प्रतिमीटर दराने कापड विक्री केलेल्या पॉपलीन कारखानदारांना नवीन सौद्यात २५ पैसे वाढवून देणे, यावर पॉपलीन यंत्रमागधारक समिती व अडते कापड व्यापारी यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत एकमत झाले. रखडलेल्या विषयांवर तोडगा निघाल्याने थांबविण्यात आलेली पॉपलीन कापडाची विक्री सुरू करण्याचे आवाहन यावेळी सागर चाळके, दिलीप ढोकळे यांनी केले.
वस्त्रोद्योगातील मंदी व सूत दरवाढीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी यातून कापडाला दर मिळत नाही. अशा परिस्थितीत पॉपलीन कापडाची खरेदी करताना कमी भाव दिला जात असल्याने व्यापारी, दलाल व यंत्रमागधारक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच एका पॉपलीन व्यापाऱ्याने सुताचे दर कमी झाल्याचा चुकीचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यातून शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर एकत्र आलेल्या कारखानदारांनी या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यावेळी पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष उगमचंद गांधी यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून बैठका सुरू होत्या. अखेर बुधवारी झालेल्या बैठकीत वरीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आले. त्याचबरोबर पेमेंटधारा डिलिव्हरी गेल्यापासून तीन दिवसांत कोणताही वटाव न कपात करता पैसे अथवा धनादेश घेणे. नवीन सौदा करताना दलालाऐवजी व्यापाऱ्यांशी संपर्क करून माहिती देणे-घेणे, असेही ठरविण्यात आले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले पॉपलीन कापडाचे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. बैठकीस अडते असोसिएशनमार्फत उगमचंद गांधी, बाबूलाल चोपडा, पारस बालर, महावीर चोपडा, रमेश जैन, पॉपलीन असोसिएशनच्यावतीने अशोक स्वामी, श्रीशैल कित्तुरे, तुकाराम साळुंखे, नंदकुमार कांबळे, आदी उपस्थित होते.