के. पीं.चा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

By Admin | Updated: December 14, 2014 00:57 IST2014-12-14T00:57:03+5:302014-12-14T00:57:03+5:30

पराभवाची जबाबदारी : तरुण चेहऱ्यास संधी देणार

Of The resignation of the post of district president of the district | के. पीं.चा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

के. पीं.चा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाचा आपण राजीनामा पक्षनेतृत्वाकडे पाठविल्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले. परंतु, पक्षनेतृत्वांनी अजून राजीनामा स्वीकारला नसला तरी जिल्हाध्यक्ष म्हणून नवीन व तरुण चेहऱ्याला संधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताराबाई पार्क येथील पक्ष कार्यालयात आयोजित सभासद नोंदणी प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण त्याचवेळी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे राजीनामा सादर केला आहे. मात्र, पक्षनेतृत्वाने तो अद्याप स्वीकारलेला नाही; पण जनता त्याच त्याच चेहऱ्यांना कंटाळली आहे. त्यामुळे आपण बाजूला होऊन नवीन चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. शिरोळ तालुक्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असणारच आहे. त्याचबरोबर हातकणंगले व इचलकरंजी मतदारसंघाची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल. पक्षाकडून तुम्हाला निमंत्रण येणार नाही, आता तुम्हीच पुढाकार घ्यावा, असे आवाहनही के. पी. पाटील यांनी केले. पराभूत झाला म्हणून काम थांबवू नका, आम्हीही पराभूत होऊनच आमदार झालो. आता तुम्ही राष्ट्रवादीचे शिरोळचे पराभूत आमदार आहात, कोणावर राग धरू नका, मेहनत करा, यश तुमचेच असेल, असा सल्लाही पाटील यांनी राजेंद्र पाटील यांना दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Of The resignation of the post of district president of the district