कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा, एक वर्षाची मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:16 IST2017-12-12T19:10:47+5:302017-12-12T19:16:39+5:30
कोल्हापूर शहराच्या महापौर हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या पदांचे राजीनामे दिले. महानगरपालिकेतील सत्तेत बहुमतात असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांच्या नेतृत्वाने ठरवून दिलेली एक वर्षाची मुदत संपल्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे राजीनामे दिले.

कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौरांचा राजीनामा, एक वर्षाची मुदत संपली
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या महापौर हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या पदांचे राजीनामे दिले. महानगरपालिकेतील सत्तेत बहुमतात असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांच्या नेतृत्वाने ठरवून दिलेली एक वर्षाची मुदत संपल्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे राजीनामे दिले. एक वर्षाच्या कार्यकाळात आपण शहर विकासाच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकलो, असे फरास यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्ताकारणात महापौर, उपमहापौर यांसह अन्य पदे कॉँग्रेस व राष्ट्रवादीने एक-एक वर्षासाठी वाटून घेतली आहेत. संपलेल्या वर्षात महापौरपद हे राष्ट्रवादीकडे, तर उपमहापौरपद हे कॉँग्रेसकडे होते.
फरास व माने यांची एक वर्षाची मुदत ८ डिसेंबर रोजी संपली होती. त्यामुळे त्यांच्याकडून राजीनामा अपेक्षित होता. आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या आदेशानुसार त्यांनी मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता सर्वसाधारण सभेत आपले राजीनामे सादर केले.
तत्पूर्वी सकाळी महापौर फरास यांनी राजर्षी शाहू समाधिस्थळी जाऊन पंधरा मिनिटे ध्यानधारणा केली. शेवटच्या दिवशी त्यांनी तीन विकासकामांचे उद्घाटनही केले.