रोजगार नोंदणीतून विद्यार्थ्यांची सुटका
By Admin | Updated: July 12, 2014 00:41 IST2014-07-12T00:34:26+5:302014-07-12T00:41:40+5:30
आयटीआय प्रवेश : अर्ज भरताना होणाऱ्या विलंबामुळे घेतला निर्णय

रोजगार नोंदणीतून विद्यार्थ्यांची सुटका
प्रदीप शिंदे - कोल्हापूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) प्रवेश घ्यायचा असेल तर रोजगार व स्वयंरोजगारांची नोंदणी करणे बंधनकारक होती. यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळ लागत होताच; पण सर्व्हर डाऊन असल्यामुळे गतवर्षी प्रवेश प्रक्रियेस उशिरा सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदापासून अर्ज भरताना रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी करणे ही क्लिष्ट प्रक्रिया शासनाने रद्द केल्याने प्रवेश अर्ज भरण्याचा मार्ग सोईस्कर झाला आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय) तर्फे विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा व अर्ज भरणे सोईस्कर व्हावे या उद्देशाने गतवर्षीपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरूकरण्यात आली. मात्र, प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरताना प्रथम रोजगार व स्वयंरोजगारचा अर्ज भरल्यानंतरच आय.टी.आय.चा अर्ज भरला जात होता. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता; पण त्याचसोबत नेहमी सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दोन - दोन दिवस थांबावे लागत होते. या सर्व प्रकारमुळे प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी करणे बंद करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे यंदापासून स्वयंरोजगार व रोजगार नोंदणी करणे पद्धत बंद केल्याने आता आॅनलाईन अर्ज भरणे सोईस्कर झाले आहे.