हुकूमशाही गृहपाल इनामदारांची बदली करा

By Admin | Updated: July 12, 2014 00:41 IST2014-07-12T00:35:12+5:302014-07-12T00:41:24+5:30

आंबेडकर वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी मांडले गाऱ्हाणे

Replace dictatorships inmates | हुकूमशाही गृहपाल इनामदारांची बदली करा

हुकूमशाही गृहपाल इनामदारांची बदली करा

कोल्हापूर : ‘इनामदार आहेत बेइनामदार’, ‘ जेवण नको आम्हाला, न्याय हवा आम्हाला’, अशा घोषणा देत निदर्शने करत कसबा बावडा (ता. करवीर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आज, शुक्रवारी गृहपाल राजेंद्र इनामदार यांच्या बदलीची मागणी केली. गृहपाल इनामदार हे सूडबुद्धीने, हुकूमशाही व दडपशाहीचे वर्तन करतात. तसेच सुविधा मागितल्यास धमकी देतात, अशा तक्रारींचे गाऱ्हाणे या विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्यासमोर मांडले.
या वसतिगृहातील विद्यार्थी सकाळी साडेअकरा वाजता मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. याठिकाणी प्रवेशद्वारावर त्यांनी घोषणा देत निदर्शने केली. त्यानंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांना दिले. यावेळी पवार यांनी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. विजय गायकवाड यांना बोलविले. या दोन्ही अधिकाऱ्यांसमोर गृहपाल इनामदार यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या, त्यांचे दडपशाहीचे वर्तन, आंदोलन केल्यास कारवाई करण्याची दिलेली धमकी अशा विविध तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर डॉ. गायकवाड यांनी वस्तुस्थिती पाहून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात किरण कांबळे, विजय कोळी, अभिजित कांबळे, प्रदीप कांबळे, परशराम पाटील, प्रवीण शेंडगे, नागेश लोखंडे, सोहम पोतदार, आदींसह ३५हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ. गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दुपारी वसतिगृहाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतली.
---आता जुजबी कारवाई नकोच
गृहपाल इनामदार यांच्याबद्दल यापूर्वी केलेल्या आंदोलनानंतर समाज कल्याण विभागाकडून त्यांची चौकशी झाली. त्यावर जी कारवाई झाली, ती पक्षपाती स्वरूपातील होती. समाजकल्याण विभागाकडे दि.४ एप्रिल २०१४ रोजी लेखी तक्रार केली. पण, त्यावर कारवाई झालीच नसल्याचे विद्यार्थी प्रतिनिधी किरण कांबळे व विजय कोळी यांनी सांगितले. ते म्हणाले, वसतिगृहात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नंदुरबार, आदी जिल्ह्यांतील ४० विद्यार्थी सध्या आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्यांना धमकाविण्याचे प्रकार गृहपाल इनामदार हे करतात. त्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. गृहपालांचे वर्तन सहन होत नसल्यानेच आंदोलनाचा निर्णय घेतला.

Web Title: Replace dictatorships inmates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.