इचलकरंजी : दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शेतकरीविरोधी कायदे त्वरित मागे घ्यावेत, या मागणीसाठी शनिवारी माकपच्या वतीने गांधी पुतळा चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शेतकरीविरोधी कायदे मागे घ्या, शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा केंद्र सरकारच्या विरोधात देण्यात आल्या. गेले ६६ दिवस दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासंदर्भात शेतकरी ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत चालू असताना काही समाजविरोधी केंद्र सरकारधार्जिण्या गुंडांनी शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे व त्यांच्यावर हल्ला करण्याचे कारस्थान सुरू केले आहे, असा आरोप केला. यावेळी सदा मलाबादे, ए. बी. पाटील, दत्ता माने, शिवगोंडा खोत, सुभाष कांबळे, अण्णासाहेब शहापुरे, अमोल नाईक आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी) इचलकरंजीत माकपच्या वतीने शनिवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.