आंदोलनाच्या रेट्याने स्थलांतर लांबले

By Admin | Updated: April 7, 2015 01:24 IST2015-04-07T00:49:11+5:302015-04-07T01:24:40+5:30

कृती समितीचा ठिय्या : शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयास राजारामपुरी शाळा क्र.९ चे मैदान न देण्यावर ठाम

Removed by the rate of movement carried out | आंदोलनाच्या रेट्याने स्थलांतर लांबले

आंदोलनाच्या रेट्याने स्थलांतर लांबले

कोल्हापूर : राजारामपुरीतील राजाराम विद्यालय व छत्रपती विजयमाला कन्या शाळेसमोरील (शाळा क्र. ९) खेळाचे मैदान शहर पोलीस वाहतूक शाखेला कोणत्याही स्थितीत न देण्यास येथील नागरिक ठाम आहेत. सोमवारी सकाळी मैदान बचाव सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या दारात जोरदार निदर्शने करीत प्रशासन विरोधी घोषणा दिल्या. त्यामुळे सोमवारी या ठिकाणी होणारे शहर वाहतूक शाखेचे स्थलांतर करण्याचे धाडस झाले नाही.दरम्यान, नागरिकांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना निवेदन देऊन वाहतूक शाखेला इतरत्र जागा देण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या उत्तराने समाधान न झाल्याने कार्यकर्त्यांनी मैदानासाठी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
राजारामपुरी, दौलतनगर, जागृतीनगर, शाहूनगर, शाहू मिल कॉलनी या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी शाळा क्र.९ हे एकमेव मैदान आहे. येथील एक शाळा बंद अवस्थेत आहे. या शाळेच्या तीन खोल्या शहर पोलीस वाहतूक शाखेला देण्याचा महापालिकेच्या स्थायी समितीने ठराव मंजूर केला. नागरिकांनी यापूर्वीही शाळेचे मैदान वाचविण्यासाठी आंदोलन केले. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत छत्रपती विजयमाला विद्यालय हे नाव खोडून त्या जागी कार्यालयाचे नाव लिहिले. यानंतर मैदान बचाव कृती समितीच्या वाहतूक शाखेचा फलक रविवारी खोडून काढला.
शहर वाहतूक शाखेचे स्थलांतर सोमवारी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती समजल्याने सकाळी साडेनऊपासून परिसरातील कार्यकर्ते शाळेजवळ जमले. मात्र, वाहतूक शाखेने आंदोलकांच्या धास्तीने स्थलांतर पुढे ढकलले. शाळेच्या विद्यार्थ्यांसह आंदोलकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा करून निषेध नोंदविला. यानंतर कार्यकर्त्यांनी मोर्चा महापालिकेत आयुक्तांच्या दालनाकडे वळविला.
सुमारे अर्धा तास आयुक्तांशी कार्यकर्त्यांनी जागेबाबत हुज्जत घातली. पोलीस प्रशासनाला दुसरी जागा देण्याबाबत पोलीस अधीक्षकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्तांनी ठामपणे बजावले. वाहतूक शाखेच्या कार्यालयाची येथील नियोजित जागा न बदलल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, नगरसेवक मुरलीधर जाधव, वसंत कोगेकर, राजू पसारे, बाबा इंदुलकर, दुर्गेश लिंग्रस, काका पाटील, कमलाकर जगदाळे, आदी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)


१ सध्या या मैदानावर मुलांच्या खेळापेक्षा परिसरातील अवजड वाहने तसेच व्यापाऱ्यांची वाहने लावण्यासाठी वापर होतो. कृती समितीने मैदान वाचवून ते निव्वळ पार्किंगसाठी खुले करू न देता मुलांना खेळासाठीही याचा वापर व्हावा, यासाठीही प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
२शाळेच्या तीन खोल्या वाहतूक शाखेला देण्यासाठी दहा लाख रुपये खर्च केले आहेत. आता आंदोलनामुळे इतरत्र कार्यालय हलविणे शक्य होणार नाही, असा मनपा प्रशासनाचा सूर आहे. शाळेचे मैदान बंदिस्त करून कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या खेळासाठी खुले ठेवण्याच्या अटीवर महापालिका व पोलीस प्रशासन आंदोलकांशी चर्चेद्वारे तोडगा काढण्याची शक्यता आहे.


शहरात वाहतुक ीला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने पोलीस प्रशासनाला सोयी व सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून वाहतूक शाखेच्या नवीन जागेबाबत निर्णय घेतला जाईल.
- पी. शिवशंकर, आयुक्त

Web Title: Removed by the rate of movement carried out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.