वृक्षारोपण करून आठवण ठेवा
By Admin | Updated: February 23, 2015 23:55 IST2015-02-23T23:46:54+5:302015-02-23T23:55:58+5:30
पानसरे कुटुंबीयांचे आवाहन : राज्यातील कार्यकर्त्यांना देणार अस्थिकलश

वृक्षारोपण करून आठवण ठेवा
कोल्हापूर : प्रत्येक कार्यकर्त्यांने अॅड. गोविंद पानसरे यांच्या अस्थींचे वृक्षारोपांद्वारे शेतात वृक्षारोपण करून त्यांच्या आठवणी चिरंतन ठेवा, असे आवाहन पानसरे कुटुंबीय व कार्यकर्त्यांच्यावतीने सोमवारी केले. पंचगंगा स्मशानभूमीवर सकाळी पानसरे यांची मुलगी स्मिता सातपुते, मेघा पानसरे-बुट्टे, जावई बन्सी सातपुते, हेमंत बुट्टे यांनी पानसरे यांच्या अस्थी (रक्षा)चे दर्शन घेतले. त्यानंतर प्रत्येक वृक्षरोपामध्ये अस्थी टाकून ते प्रत्येक कार्यकर्त्याला दिले. गोविंद पानसरे यांची मरणोत्तर कोणताही विधी करू नये, अशी इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या अस्थी वृक्षरोपामधून देण्यात आल्या.
गेल्या सोमवारी (दि. १६) अॅड. पानसरे यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या पानसरे यांची प्राणज्योत मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात शुक्रवारी (दि. २०) मालवली. शनिवारी (दि. २१) त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत कोणत्याही विधीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
सोमवारी अस्थिदर्शन घेतेवेळी स्मिता पानसरे म्हणाल्या, माझ्या वडिलांनी वाईट प्रथा, रुढी यांच्या विचारांना आयुष्यभर विरोध केला. त्याच विचारांचे अनुकरण म्हणून त्यांची रक्षा राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला देण्यात आली. यातून त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील.
भालचंद्र कांगो म्हणाले, या अस्थी पक्षाचे कार्यकर्ते घेऊन जातील. त्यांचे शेतामध्ये वृक्षारोपण करून त्यांचे विचार, आठवणी सदैव ते स्मरणात ठेवतील. त्यानंतर पानसरे यांच्या अस्थी दसरा चौक, शाहू स्मारक भवन येथे सुरू असलेल्या २२ व्या राज्य अधिवेशनात दर्शनासाठी नेण्यात आल्या.
त्याठिकाणी राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला अस्थी देण्यात येणार आहेत. यावेळी दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, एम. बी. पडवळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.