धार्मिक कार्यक्रम आटोपशीर; भाविकांच्या दर्शनरांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:23 IST2020-12-29T17:20:04+5:302020-12-29T17:23:27+5:30
Datta Mandir Kolhapur- कोल्हापूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दत्त जयंती सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले. मात्र, मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. पालखी सोहळाही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये केवळ मंदिर परिसरातून झाला. यावेळी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असा जयघोष करण्यात आला.

कोल्हापूर कॉमर्स कॉलेजजवळील दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले.(छाया : आदित्य वेल्हाळ )
कोल्हापूर : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दत्त जयंती सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आले. मात्र, मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा होत्या. पालखी सोहळाही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये केवळ मंदिर परिसरातून झाला. यावेळी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असा जयघोष करण्यात आला.
कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत असले तरी धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दत्त जयंती सोहळ्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शहरातील सर्वच दत्त मंदिरांमध्ये नियमांचे पालन करत धार्मिक कार्यक्रम झाले.
कॉमर्स कॉलेजजवळील दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरात पुजारी योगेश व्यवहारे आणि युवराज कांबळे यांनी मयूरारूढ रूपातील पूजा बांधली होती. येथे सायंकाळी सहाच्या सुमारास जन्मकाळ सोहळा आणि रात्री साडेआठच्या सुमारास मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा झाला.
दरम्यान, दिवसभर येथे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी मुख्य प्रवेश मार्गाऐवजी आझाद चौक येथील प्रवेशद्वारातून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला तर दर्शन घेतल्यानंतर एकविरा देवी मंदिर परिसरातून बाहेर सोडण्यात आले.
अंबाबाई मंदिरातील दत्तात्रय देवमठ संस्थान, दत्त गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर, गंगावेशमधील दत्त मंदिर, मिरजकर तिकटीजवळील एकमुखी दत्त मंदिरासह शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्ली, मंगळवार पेठेतील देवणे गल्ली, बागल चौक, सानेगुरुजी वसाहतीतील संतोष कॉलनी, शाहूनगर, आर. के. नगर, रुईकर कॉलनी, विक्रमनगर, महाडिक वसाहत, सम्राटनगर येथील दत्त मंदिरात भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. तसेच प्रज्ञापुरी आणि कोटितीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरांतूनही सकाळपासून भाविक दर्शनसाठी येत होते.