रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची तगमग थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:21+5:302021-05-08T04:25:21+5:30

कोल्हापूर : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांची एकीकडे तगमग सुरू असून दुसरीकडे ही इंजेक्शन्सच ...

Relatives will not stop waiting for Remedivir | रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची तगमग थांबेना

रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची तगमग थांबेना

कोल्हापूर : रेमडेसिविर इंजेक्शनसाठी नातेवाइकांची एकीकडे तगमग सुरू असून दुसरीकडे ही इंजेक्शन्सच मिळत नसल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र कायम आहे. गेल्या सहा दिवसांत ३३ हजार इंजेक्शन्सची कोल्हापूर जिल्ह्यातून मागणी नोंदविण्यात आली. मात्र, केवळ १८८७ इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आणि त्याबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणीही वाढू लागली. रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण दाखल केला की, पहिल्यांदा डॉक्टर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणून द्या म्हणून सांगतात. प्रचंड टंचाई असल्याने मग नातेवाईक राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री यांच्यामागे लागतात. अगदीच कोणाची ओळख नसेल तर पत्रकारांच्याही ओळखीने कुठे इंजेक्शन्स मिळतील का याची माहिती घेतली जाते. परगावातील आपल्या नातेवाईक, मित्रांना माहिती दिली जाते. त्यांच्याकडून त्यांच्या मित्रपरिवाराला आवाहन केले जाते; परंतु एवढे सगळे करूनही इंजेक्शन्स मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाकडून या इंजेक्शन्सचे वितरण आणि समन्वय सुरू असला तरी मुळातच पुरवठाच होत नसल्याने केवळ फोनवरून प्रयत्न करतो एवढेच सांगणे सर्वांच्या हातात राहिले आहे.

चौकट

खरोखरच रेमडेसिविर हवे का

एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, शासन सेवेतील वरिष्ठ डॉक्टर सरसकट रेमडेसिविर देऊ नका असे सांगत असताना मग रुग्णालयात गेल्या गेल्या डॉक्टर हेच इंजेक्शन आणा म्हणून का सांगतात हाच खरा प्रश्न आहे. जर हे इंजेक्शन आपल्या शहरातच नव्हे, तर देशभरात लवकर मिळत नाही अशी परिस्थिती असताना ती एकच संजीवनी असल्यासारखे डॉक्टर त्याचा आग्रह का धरतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे साईड इफेक्ट असल्याचेही सांगितले जाते. मग त्याला पर्याय काहीच नाही का, अशी विचारणा अनेक नातेवाईक करू लागले आहेत.

चौकट

इंजेक्शन्स आणलेल्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज

या इंजेक्शनबाबत अनेक भन्नाट गोष्टी सांगितल्या जात आहेत. एका तालुकास्तरीय शहरातील रुग्णालयामध्ये तीन रुग्णांसाठी सहा रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यास सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात कुठेच ती मिळत नसल्याने नातेवाइकांनी १८५० रुपयांचे इंजेक्शन ६ हजार रुपयांना खरेदी करून ३६ हजार रूपयांची इंजेक्शन्स आणून दिली. ही इंजेक्शन्स आणून दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मग ही इंजेक्शन्स मागवली कशाला, असा प्रश्न उपस्थित होतो.

चौकट

दिनांक इंजेक्शन्सची मागणी पुरवठा

१ मे : ५७८६ : ३००

२ मे : ३१८१ : ३६०

३ मे : ५३३१ : १०२

४ मे : ६३६३ : ५३०

५ मे : ६४९० : ५५३

६ मे : ५८०२ : ४२

एकूण : मागणी ३२९५३ : पुरवठा १८८७

Web Title: Relatives will not stop waiting for Remedivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.