१६१ गावांमध्ये सत्तांतर
By Admin | Updated: July 28, 2015 01:23 IST2015-07-28T01:12:59+5:302015-07-28T01:23:42+5:30
प्रस्थापितांचा सुपडासाफ : करवीरमध्ये काँग्रेस, पन्हाळा-शाहूवाडीत ‘जनसुराज्य’चे वर्चस्व

१६१ गावांमध्ये सत्तांतर
कोल्हापूर : जिल्ह्यात अत्यंत अटीतटीने व चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत ३७० पैकी १६१ ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत सत्तांतर घडविले. करवीरमध्ये काँग्रेसने, तर पन्हाळा-शाहूवाडीत ‘जनसुराज्य’ने प्राबल्य राखले. शिवसेनेने अनेक ठिकाणी मुसंडी मारली असून, उर्वरित तालुक्यांत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. अनेक ठिकाणी त्रिशंकू संख्याबळामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ३७० ग्रामपंचायतींसाठी शनिवारी (दि. २५) सरासरी ८५.१८ टक्के मतदान झाले होते. १५०७ प्रभागांतील ३९६३ जागांसाठी तब्बल ७७९० उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. करवीर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींपैकी १७ ठिकाणी सत्तांतर झाले. येथे स्थानिक आघाड्यांमध्येच लढती झाल्या असल्या तरी करवीर मतदारसंघातील बहुतांश गावांत पी. एन. पाटील गटाने, तर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील गटाने आपले वर्चस्व राखले आहे. कोपार्डे, खाटांगळे, कुडित्रे येथे सत्तांतर करत आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाने जोरदार मुसंडी मारली. पन्हाळा तालुक्यात १२ ठिकाणी सत्तांतर झाले असून, येथे माजी मंत्री विनय कोरे यांच्या गटाने १९ ठिकाणी यश संपादन करत वर्चस्व कायम ठेवले. शिवसेनेलाही ११ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले आहे. शाहूवाडी तालुक्यातही जनसुराज्य-काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. येथे ३६ पैकी १८ ठिकाणी सत्तांतर झाले असून, शिवसेनेला मात्र आपले गड शाबूत राखताना दमछाक उडाली. भुदरगडमध्ये स्थानिक आघाड्यांत निवडणुका झाल्या. येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायतींचा दावा केला असला तरी पक्षीय बलाबलाचे चित्र सरपंच निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. गगनबावडा तालुक्यात तीन ठिकाणी सत्तांतर झाले असून, काँग्रेस, राष्ट्रवादीने आपले गड शाबूत ठेवले असले तरी शिवसेना पाच ठिकाणी सत्तेत आली. शिरोळमध्ये दहा ठिकाणी सत्तांतर झाले असून, येथे स्थानिक आघाड्यांनीच प्राबल्य राखले. हातकणंगलेमध्ये दहा ठिकाणी सत्तांतर झाले असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये त्रिशंकू अवस्थेमुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. चंदगडमध्ये १८ ठिकाणी सत्तांतर झाले असून, ‘स्वाभिमानी’, शिवसेनेने प्रत्येकी दोन, तर काँग्रेसने सहा ठिकाणी सत्ता राखली. येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्णपणे पीछेहाट झाली. आजऱ्यामध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली असून, आठ ठिकाणी सत्तांतर झाले. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांना जोरदार झटका बसला. राधानगरीमध्ये केवळ गुडाळमध्ये सत्तांतर झाले. पक्षीय बलाबल पाहता तीन राष्ट्रवादी, चार काँग्रेस, तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली. गडहिंग्लजमध्ये २४ ठिकाणी सत्तांतर झाले आहे.
सोयीच्या आघाड्यांनी कागलमध्ये त्रांगडे
कागलचे राजकारण पक्षापेक्षा गटा-तटांवरच अवलंबून आहे. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत विचित्र आघाड्या झाल्या होत्या. काही ठिकाणी मंडलिक-मुश्रीफ विरुद्ध घाटगे गट, तर १७ ठिकाणी मुश्रीफ गट विरुद्ध सर्वजण, अशा लढती झाल्या होत्या. त्यामुळे सत्तेचे बलाबल ठरविणे अवघड आहे.