चिकोत्रा खोऱ्यात कारवाई कमी; पण खा...की...चाच प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:54+5:302021-01-13T05:00:54+5:30
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील वीस ते पंचवीस गावांत कायदा, सुव्यवस्था व शांतता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ...

चिकोत्रा खोऱ्यात कारवाई कमी; पण खा...की...चाच प्रभाव
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील वीस ते पंचवीस गावांत कायदा, सुव्यवस्था व शांतता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सेनापती कापशी (ता. कागल) पोलीस आऊटपोस्ट चौकी कायम बंद अवस्थेत असल्याने न्याय मागायचा तरी कुठे ? अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. पोलीस स्टेशन उघडे नसतेच आणि असले तर ते पोलिसांच्या सोयीनुसारच. यामुळे चिकोत्रा खोऱ्यात अवैध व्यवसाय फोफावले असून कारवाई कमी पण खा....की...चाच प्रभाव असल्याने न्याय्य मागण्यांकरता आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे चिकोत्रा खोऱ्यातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमठत आहेत.
पोलिसांच्या काम करण्याच्या पद्धतीचा अंदाज आल्यानेच या परिसरात अवैध व्यावसायिकांनी आपले तोंड वर काढले आहे. या परिसरात आगदी धूमधडाक्यात मटका, तीन पानी जुगार अड्डे, अनेक गावांत गावठी दारू विक्री तसेच शाळांच्या परिसरातील दुकानांतून राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. महाविद्यालयीन तरुण मटक्याच्या मोहजालात अडकत आहेत. मटका चालवण्यासाठी पोलीस अभय का देत आहेत का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. पोलीस ठाणे उघडे असले की, याठिकाणी परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्या खाबुगिरी लोकांचीच रेलचेल असते. एकूणच पाहता येथे कायद्याची भीती आहे की नाही? असा मोठा प्रश्न जनतेला पडला आहे. सर्वसामान्य जनता पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे भरडली जात आहे. तक्रार देण्यासाठी कोणी आले की, पोलीस ठाण्याचे दार बंद असते, मग फोनवरूनच थेट मुरगुडला या, असा निरोप दिला जातो. मग कापशी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे काम नेमके आहे तरी काय ? या परिसरातील जनतेला सोयीचे पोलीस आऊट पोस्ट असूनही मनमानी कारभारामुळे न्याय मिळत नाही, अशी येथील जनतेची भावना झाली आहे.
सदर पोलीस आऊट पोस्ट कायम उघडे राहावे व लोकांची कामे याठिकाणी पूर्ण व्हावीत, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे. लोकप्रतिनिधीही याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. यामुळे या खोऱ्यातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमठत असून जनता आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.