कोल्हापूर : पूर्वी निसर्गाचे कालचक्र काहीसी ठरलेले असायचे. पण, अलीकडील पाच वर्षांत हे चक्र पूर्णपणे बदलल्याने त्याचा फटका सगळ्यांनाच बसू लागला आहे. यंदा मान्सूनच्या पहिल्या ५० दिवसांतच विक्रमी ६२२.५ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. हा पाऊस गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक असून, जून-जुलैच्या सरासरीच्या ७७ टक्के आहे.यंदा वळीव पाऊस थांबला तोपर्यंत मान्सून सक्रिय झाल्याने खरिपाच्या पेरण्या थांबल्या होत्या. आतापर्यंत जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धूळवाफ पेरण्या पूर्ण होतात, त्यानंतर मान्सून सक्रिय होतो. पण, यावर्षी शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेली ५० दिवस पाऊस सुरू आहे, धूळवाफ पेरण्या थांबल्या होत्या. जिथे शक्य आहे, तिथे भाताची रोप लागण शेतकऱ्यांनी करून घेतली आहे.पिके आकसली..सततच्या पावसाने जमिनीला वापसा नाही. या वातावरणाचा पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिके गारठली असून, त्याचा मोठा फटका ऊस पिकाला बसणार आहे.
कोल्हापूरकरांना २५ जूलैची धास्ती
मान्सूनमध्ये २५ जुलै आला की कोल्हापूरकरांचा ठोका वाढतो. दि. २५ जुलै २०२१ पासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आणि महापुराचा विळखा पडला. तेव्हापासून हा दिवस जवळ आला की नागरिकांना धास्तीच वाटते. यावर्षी २५ जुलैपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.यंदा २०२१ चे रेकार्ड मोडलेयंदा मान्सून वेळेत सक्रिय झाला आणि त्यामध्ये सातत्य राहिले. आठ-दहा दिवसांचा अपवाद वगळता सलग पाऊस राहिला आहे. यंदा जूनमध्ये ४१५, तर जुलैच्या २० दिवसांत २०७ असा ६२२.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या तुलनेत २०२१ मध्ये आतापर्यंत ५९०.८ मिलीमीटर पाऊस झाला होता.
२० जुलैपर्यंतचा तुलनात्मक पाऊस, मिलीमीटरमध्येवर्ष - पाऊस
- २०२१ - ५९०.८
- २०२२ - ५९६.६
- २०२३ - ३७३.६
- २०२४ - ५७७.७
- २०२५ - ६२२.५