स्वातंत्र्यसूर्य: रत्नाप्पाण्णा कुंभारांनी फडकविला पन्हाळा कचेरीवर तिरंगा

By संदीप आडनाईक | Updated: August 9, 2022 16:19 IST2022-08-09T16:18:20+5:302022-08-09T16:19:00+5:30

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव भागातील क्रांतिलढ्याची सूत्रे अण्णांकडे होती. माधवराव बागल यांच्यासारख्या नेत्यांना अटक झाल्याने दक्षिण महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वही अण्णांकडेच आले होते. त्यांनी भूमिगत राहून गनिमी काव्याने स्वातंत्र्यलढ्याचे यशस्वी नेतृत्व केले.

Ratnappanna Kumhar had the sources of revolutionary struggle in Kolhapur, Sangli, Satara, Belgaum | स्वातंत्र्यसूर्य: रत्नाप्पाण्णा कुंभारांनी फडकविला पन्हाळा कचेरीवर तिरंगा

स्वातंत्र्यसूर्य: रत्नाप्पाण्णा कुंभारांनी फडकविला पन्हाळा कचेरीवर तिरंगा

रत्नाप्पाण्णा कुंभार. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक. शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव या छोट्याशा खेडेगावात भरमाप्पा सत्याप्पा कुंभार व बाळाबाई कुंभार यांच्यापाेटी १५ सप्टेंबर १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला. १९१७ ते १९२४ या काळात सातव्या इयत्तेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १८२८ मध्ये हातकणंगलेतून मॅट्रिकची परीक्षा पास केली. १९३१ मध्ये इंटरमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी १९३३ मध्ये राजाराम कॉलेजमध्ये बीएची पदवी प्राप्त केली. साइक्स लॉसाठी त्यांनी प्रवेश घेतला; पण माधवराव बागलांच्या प्रजा परिषदेमार्फत सामाजिक चळवळीकडे आकृष्ट झाले.

१९४० च्या सुमारास या संघटनेवर बंदी आली. या काळात ते तुरुंगातही गेले. दरम्यानच्या काळात ते महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्याकडे आकृष्ट झाले होते. त्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांनी पुढे आयुष्यभर गांधीवादी मार्गाने राजकारण आणि समाजकारण केले.

१८ ऑक्टोबर १९४२ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरातील स्वातंत्र्यसंग्रामाचे रणशिंग फुंकले. सार्वत्रिक हरताळ, सभा, मिरवणुका या मार्गांनी लढ्यास प्रारंभ झाला. स्वातंत्र्यलढ्याचा हा वणवा हा हा म्हणता तत्कालीन कोल्हापूर संस्थानभर, खेड्यापाड्यात पसरत गेला. ८ ऑगस्ट १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनानंतर रत्नाप्पाण्णा भूमिगत झाले आणि स्वातंत्र्यलढा गतिमान ठेवण्याचा भार उचलला.

कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव भागातील क्रांतिलढ्याची सूत्रे अण्णांकडे होती. माधवराव बागल यांच्यासारख्या नेत्यांना अटक झाल्याने दक्षिण महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वही अण्णांकडेच आले होते. त्यांनी भूमिगत राहून गनिमी काव्याने स्वातंत्र्यलढ्याचे यशस्वी नेतृत्व केले. रत्नाप्पाण्णांनी नियोजनबद्ध आखणी व संघटन कौशल्याच्या बळावर एकापाठोपाठ एक योजना यशस्वी केल्या. पाहू या त्यांच्या काही घटना.

बर्मा खजिना लूट

घटना पहिली : निर्वासित ब्रह्मदेश सरकारचा कोल्हापुरातील खजिना लुटण्याची धाडसी योजना रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी आखली. याची जबाबदारी कुरुंदवाडचे सेवादल सैनिक अब्दल अथणीकर यांच्यावर सोपविण्यात आली. १ एप्रिल १९४३ रोजी टांग्यातून खजिना घेऊन जाणाऱ्या ब्रह्मी अधिकाऱ्याला सॅल्यूट ठोकून व त्याला एक दरबारी लखोटा देऊन अथणीकरांनी अत्यंत चपळाईने खजिन्याची थैली लांबविली. यातून २३,३८४ रुपयांची रक्कम हाती आली.

गारगोटी कचेरीवरील हल्ला

घटना दुसरी : दक्षिण कोल्हापूर जिल्हा स्वतंत्र करण्यासाठी गारगोटीच्या मामलेदार कचेरीवर हल्ला करण्याची योजना रत्नाप्पाण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी आखली. यासाठी ऑक्टोबर १९४२ मध्ये कापशी येथे क्रांतिकारकांची गुप्त बैठक झाली व गारगोटी कचेरीवर हल्ल्याची तपशीलवार योजना तयार करण्यात आली. रत्नाप्पाण्णा यांच्या जोडीला कापशीचे करवीरय्या सिद्धय्या स्वामी होते. पोलिसांची कुमक वेळेवर येऊ नये यासाठी गारगोटीला जोडणारा वेदगंगेवरील पूल उडवून देण्याचे त्यांनी ठरविले होते. १३ डिसेंबर १९४२ रोजी गारगोटी कचेरीवर हल्ला केला गेला. दुर्दैवाने पूल उडविण्याचा प्रयत्न फसला. मामलेदार कचेरीला आग लावली. यावेळी क्रांतिकारक व पोलिसांत जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांच्या काही रायफली क्रांतिकारकांनी हस्तगत केल्या. पोलिसांच्या गोळीबारात करवीरय्या स्वामी, शंकर इंगळे, बळवंत जबडे, परशुराम साळुंखे, तुकाराम भारमल, मल्लाप्पा चौगुले व नारायणराव वारके हे शहीद झाले. या हल्ल्यामुळे बिथरलेल्या सरकारने ४६ लोकांवर कोर्टात खटले भरले. त्यापैकी २७ जणांना आठ वर्षांची सक्तमजुरी व इतर शिक्षा झाल्या.

पन्हाळा विश्रामगृहावर हल्ला

घटना तिसरी : पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण. तेथे ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी आरामदारी विश्रामगृह बांधले गेले होते. ब्रिटिश रेसिडेंटसाठी सज्जा कोठीजवळ कचेरी व निवास व्यवस्था होती. येथून दक्षिणेतील अठरा संस्थांनावर अंकुश ठेवण्यात येत असे. ब्रिटिश साम्राज्यसत्रेच्या या उन्मत्त प्रतिकावर घाव घालण्याचा क्रांतिकारकांनी निर्णय घेतला. दत्तोबा तांबट यांच्या नेतृत्वाखाली १३ डिसेंबर १९४२ रोजी विश्रामगृहावर हल्ला केला गेला. पहारेकऱ्यास बंदी करून फर्निचर व कार्यालय पेटवून दिले. अर्ध्या तासात कचेरीवर तिरंगा फडकवून वंदे मातरमचा जयघोष करून रत्नाप्पाण्णांसह सर्व क्रांतिकारकांनी तेथून धूम ठोकली.

साखरप्याचा हल्ला

घटना चौथी : ब्रिटिश सत्तास्थानावरील हल्ल्यांबरोबरच समाजातील अनिष्ट घटकांविरुद्धही क्रांतिकारकांनी युद्ध पुकारले होते. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली दारू गुत्त्यावर हल्ले करून ते नष्ट करण्याचे प्रयत्न केलेे गेले. कोकणातील साखरपा येथील दारू गुत्ता जाळण्याचे व पोस्ट लुटण्याचे क्रांतिकारकांनी ठरवले. यावेळी गावातील देवळात पोलिसांची एक तुकडी मुक्कामास असल्याचे त्यांना कळले. भरमू चौगुल्यांनी बेसावध असलेल्या पाेलिसांच्या रायफली पळवल्या. काहींना खांबास बांधून त्यांचे गणवेश व हत्यारे काढून घेतली. यात काही पोलीस जागे झाले. त्यांची क्रांतिकारकांशी झटापट झाली; परंतु ते सर्व जण सहिसलामत निसटले. त्यांनी साखरप्याचा दारू गुत्ता जाळून टाकला.

Web Title: Ratnappanna Kumhar had the sources of revolutionary struggle in Kolhapur, Sangli, Satara, Belgaum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.