रत्नागिरीच्या नम्रता प्रतिष्ठानची बाजी

By Admin | Updated: April 9, 2015 00:01 IST2015-04-08T23:25:35+5:302015-04-09T00:01:25+5:30

कबड्डी स्पर्धा: गुड मॉर्निंग मुंबई उपविजेता. संतोष दोरवडने मारले नाठवडेचे कुस्ती मैदान

Ratnagiri's Namrata Pratishthan's beta | रत्नागिरीच्या नम्रता प्रतिष्ठानची बाजी

रत्नागिरीच्या नम्रता प्रतिष्ठानची बाजी

कुडाळ : कुडाळ येथील आमदार वैभव नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी विजेतेपदावर रत्नागिरीच्या नम्रता प्रतिष्ठान संघाने नाव कोरले. तर उपविजेतेपद गुड मॉर्निंग मुुंबई संघाने पटकावले. विजेत्या संघांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. कुडाळ येथे गेले तीन दिवस आमदार वैभव नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू होती. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीही अटीतटीचे सामने झाले. पहिला उपांत्य सामना गुड मॉर्निंग महाराष्ट्र विरुद्ध ओम कल्याण ठाणे यांच्यात झाला. या सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. मात्र, काही वेळानंतर गुड मॉर्निंग मुंबईने वर्चस्व राखले.गुड मॉर्निंग मुंबईने हा सामना ३१-१० अशा गुणांनी जिंकला.दुसरा उपांत्य सामना नम्रता प्रतिष्ठान रत्नागिरी विरुद्ध अंबिका मुंबई यांच्यात झाला. नम्रता प्रतिष्ठानने हा सामना जिंकला व अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
स्पर्धेच्या अंतिम फेरीत नम्रता प्रतिष्ठान रत्नागिरी व गुड मॉर्निंग मुंबई हे मातब्बर संंघ एकमेकांसमोर उभे ठाकले. मात्र, सामना सुरू झाल्यापासून अतिशय चांगला खेळ करीत या सामन्यावर नम्रता प्रतिष्ठान रत्नागिरी संघाने वर्चस्व राखत विजयश्री खेचून आणली. २१ - ४ अशा मोठ्या फरकाने नम्रता प्रतिष्ठानने गुड मॉर्निंग मुंबईचा पराभव केला.
विजेत्या संघांना आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अभय शिरसाट, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, संजय पडते, सुशील चिंदरकर, शेखर गावडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, यांनी उपस्थिती दर्शविली. शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून रत्नागिरी संघाच्या कुलाभूषण कुलकर्णीची निवड करण्यात आली.


येळापूर : नाठवडे (ता. शिराळा) येथील ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या संतोष दोरवडने ‘इंदोर केसरी’ रेहान खान यास नाकपट्टी डावावर नवव्या मिनिटाला अस्मान दाखवत एक लाखाचे बक्षीस जिंकले. द्वितीय क्रमांकाच्या लढतीत समीर देसाई याने गणेश वाघमोडे याच्यावर गुणांवर विजय मिळवला, तर तृतीय क्रमांकाची सागर लाड (येळापूर) व धनाजी पाटील (कोल्हापूर) यांच्यातील लढत एकविसाव्या मिनिटाला बरोबरीत सोडविण्यात आली.
प्रारंभी कुस्ती आखाड्याचे पूजन उपसरपंच बाजीराव मोहिते, ‘विश्वास’चे संचालक तानाजी वनारे, तानाजी मोहिते, राजाराम मोहिते या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानातील विजयी मल्ल असे - संजय शेडगे, अजित पाटील, किरण शेंडगे, रोहित शेडगे, तात्या इंगळे, अमर पाटील, नितीन ढेरे, अक्षय जाधव, उत्तम पाटील, प्रताप पाटील, बाबू ढेरे, ऋषिकेश जाधव, अरविंद पाटील, कृष्णात घोडे, राहुल जाधव, सुनील पाटील, अरविंद पाटील, निखिल आस्कट, अमर शिरसट, सचिन मोहिते, विशाल वनारे, संग्राम मोहिते, अजय वनारे.
मैदानात पंच म्हणून शिवाजी लाड, तानाजी जाधव, बाबूराव वनारे, शरद सावंत, सर्जेराव नांगरे, वसंत पाटील, मारुती शेणवी यांनी काम पाहिले. संजय परीट, शंकर वनारे, कृष्णा मोहिते, संभाजी मोहिते, ज्ञानदेव पाटील, बाबासाहेब पाटील यांनी संयोजन केले.
मैदानात माजी सभापती हणमंत पाटील, सुरेश चिंचोलकर, राजू गोळे, रंगराव शेडगे, दिनकर शेडगे, अंकुश नांगरे, मनोज चिंचोलकर, विलास जाधव, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ratnagiri's Namrata Pratishthan's beta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.