रेठरे बुद्रुकच्या दाम्पत्याला अटक

By Admin | Updated: December 22, 2015 01:07 IST2015-12-22T01:06:52+5:302015-12-22T01:07:09+5:30

खडकी पोलिसांची कारवाई : तपास अधिकाऱ्याला धमकी

Rathore Budruk's couple arrested | रेठरे बुद्रुकच्या दाम्पत्याला अटक

रेठरे बुद्रुकच्या दाम्पत्याला अटक

पुणे/सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकामधील पोलीस अधिकाऱ्याला तपास न थांबविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुकच्या दाम्पत्याला खडकी पोलिसांनी रविवारी अटक केली. अधिकाऱ्याकडे २५ लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती. सोमवारी त्यांना खडकी न्यायालयात हजर केले असता २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना धमकी देण्यात आली होती. चंद्रकांत दिनकर मोहिते (वय ४१) आणि त्याची पत्नी संगीता मोहिते (२५, दोघेही रा. रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात खंडणी व जिवे मारण्याची धमकी देण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी गोळ््या घालून हत्या करण्यात आली होती.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयला मदत करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सात अधिकाऱ्यांमध्ये घोडके यांचा समावेश आहे. खडकी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करीत असताना त्यांना दोन डिसेंबर रोजी मोबाईलवर धमकीचा मेसेज आला. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास थांबवावा, असे त्यात म्हटले होते. त्यानंतर नऊ डिसेंबरला त्यांना पुन्हा एकदा मेसेज आला. त्यामध्येही तपास थांबवा, असे म्हटले होते. तसेच तपास न थांबविल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
घोडके यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणीही करण्यात आली होती. घोडके यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानुसार १७ डिसेंबरला खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मोहिते दाम्पत्यांची रेठरे बुद्रुक येथे दोन-अडीच एकर शेती आहे. त्यांना दोन लहान मुले आहेत. शेतीतच मजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. (प्रतिनिधी)

मोबाईल क्रमांकावरून शोध
पोलिसांनी मोबाईलच्या क्रमांकाचा ट्रेस लावला असता हा क्रमांक कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील चंद्रकांत मोहिते व संगीता मोहिते यांच्या नावावर असल्याचे समोर आले.
त्याआधारे त्यांचा पत्ता शोधून खडकी पोलिसांचे पथक कऱ्हाडला रवाना झाले. त्या दोघांनाही रविवारी अटक केली. सोमवारी दोघांनाही खडकी न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: Rathore Budruk's couple arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.