वाघजाई डोंगरामध्ये राजू शेट्टी लक्ष घालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:31 AM2021-09-09T04:31:33+5:302021-09-09T04:31:33+5:30

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरात करण्यात येत असलेली खोदाई आणि सपाटीकरणाची पाहणी करण्यासाठी मी स्वत: येतो. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची ...

Raju Shetty will be watching at Waghjai Mountain | वाघजाई डोंगरामध्ये राजू शेट्टी लक्ष घालणार

वाघजाई डोंगरामध्ये राजू शेट्टी लक्ष घालणार

Next

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघजाई डोंगरात करण्यात येत असलेली खोदाई आणि सपाटीकरणाची पाहणी करण्यासाठी मी स्वत: येतो. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ . याविषयावर स्वतंत्र बैठक घेण्यास प्रशासनास भाग पाडू, असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी दिले. वाघजाई जतन परिसर संवर्धन समितीच्या शिष्टमंडळाला त्यांनी ही ग्वाही दिली. येथील शासकीय विश्रामगृहात समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, वाघजाई डोंगरावरील जमिनी बेकायदेशीरपणे धनदांडगे नेते, त्यांचे चमचे, प्रशासकीय अधिकारी, त्यांच्या नातेवाईकांनी हडप केल्या आहेत. नियमबाह्यपणे खरेदी विक्री सुरू आहे. खरेदी केलेले बडे लोक डोंगरात मनमानीपणे खोदाई करीत असल्याने डोंगर खचण्याचा धोका निर्माण होण्याची भीती लगतच्या बारा गावातील ग्रामस्थांमध्ये तयार झाली आहे.

डोंगरावरील जमिनीवर १९७२ पर्यंत स्थानिक शेतकऱ्यांची नावे सात, बारा उताऱ्यावर होती. १९७३ मध्ये प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, भूमिहीन अशा ५१० जणांना वाटप करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला. त्यावेळी जमिनीचा वर्षानुवर्षे ताबा असलेल्या शेतकऱ्यांचा विचार झाला नाही. वाटप केलेल्यांपैकी अनेक जणांनी जमीन स्वीकारली पण त्यांच्याकडे ताबा नाही. काही जणांनी बेकायदेशीरपणे जमिनीची विक्री केली आहे. खरेदी घेतलेले आता ताबा घेण्यासाठी आल्यानंतर संघर्ष होत आहे. नियमबाह्यपणे काही जण डोंगरावर चर मारून सपाटीकरण करीत आहेत. यामुळे अति पाऊस कमी वेळात झाल्यास डोंगर खचण्याचा धोका आहे. डोंगर खचल्यास कोकणातील माळीन गाव जसे मातीत गाडले तसे वाघजाई डोंंगर लगतच्या १२ गावांची परिस्थिती होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. यासंबंधीची तक्रार २७ नोव्हेंबर २०२० मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पन्हाळा प्रांताधिकाऱ्यांनी तहसीलदारासह १५ जणांची समिती चौकशीसाठी नियुक्त केली. पण समिती कागदावरच राहिली. निवेदन देताना भगवान पाटील, जोतीराम पाटील, प्रकाश देसाई, विक्रांत पाटील, प्रकाश पाटील, युवराज कदम, शंकर गुरव आदी उपस्थित होते.

फोटो : ०८०९२०२१-कोल- वाघजाई निवेदन

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी माजी खासदार राजू शेट्टी यांना वाघजाई जतन परिसर संवर्धन समितीच्या शिष्टमंडळ तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी १२ गावांतील ग्रामस्थ प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.

Web Title: Raju Shetty will be watching at Waghjai Mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.