राजे विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

By Admin | Updated: April 14, 2015 01:24 IST2015-04-14T01:24:09+5:302015-04-14T01:24:09+5:30

सहकारातील दीपस्तंभ : साखर कारखानदारीतील उमदे नेतृत्व, दिलदार राजा हरपला

Raje Vikram Singh Ghatge passed away | राजे विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

राजे विक्रमसिंह घाटगे यांचे निधन

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखानदारीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची नवी वाट तयार करणारे कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक व लोकनेते राजे विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे (वय ६७, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांचे सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने साखर कारखानदारीतील ‘दीपस्तंभ,’ उमदा नेता व दिलदार राजा हरपल्याची भावना व्यक्त झाली.
या लाडक्या नेत्याच्या अशा अचानक निधनाने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो जनतेला अश्रू अनावर झाले. बऱ्याच लोकांचा सुरूवातीला या बातमीवर विश्वासच बसला नाही. येथील कसबा बावड्यातील कागलवाडी परिसरातील राजघराण्याच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अलोट गर्दी उसळली होती.
घाटगे यांच्या पश्चात पत्नी श्रीमती सुहासिनीदेवी, मुलगा व शाहू दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक समरजितसिंह, कन्या तेजस्विनी भोसले, बहीण बडोद्याच्या हर्षलाराजे गायकवाड, अमरावतीच्या रंजनाराजे देशमुख व जतच्या ज्योत्स्नाराजे डफळे, भाऊ व येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रवीणसिंह असा मोठा परिवार आहे.
घाटगे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. सहकारातील जाणते नेतृत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. कागल विधानसभा मतदारसंघातून ते १९७८ व १९८० असे दोनवेळा आमदार झाले. पुढे १९९८ ला त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली; परंतु त्यात त्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी राजकारणापेक्षा साखर कारखानदारीत अधिक लक्ष केंद्रित केले. त्यांची ओळखही राजकारण्यांपेक्षा सहकाराच्या माध्यमातून रचनात्मक काम करणारा नेता अशीच अधिक ठळक झाली होती. गोरगरीब शेतकऱ्यांचे हित करायचे असेल तर सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, असा त्यांचा आग्रह राहिला. स्वत:चा शाहू साखर कारखाना तितक्याच उत्तम पद्धतीने त्यांनी चालवून दाखविला. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात उत्तम चालविलेला कारखाना कोणता म्हणून विचारणा झाल्यावर पहिले नाव पुढे येते ते अर्थातच ‘शाहू’चे. हे सगळे श्रेय घाटगे यांच्या नेतृत्वाचे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी कागलच्या राजकारणात त्यांचा सुमारे पंचवीस वर्षे टोकाचा संघर्ष झाला. मंडलिक यांचे निधन नऊ मार्चला झाले. त्यावेळी ‘आता आमचा नंबर कधी..’ असे मिश्कीलपणे म्हणणारे विक्रमसिंह यांचेही निधन लगेच महिन्याभरात व्हावे, हा देखील एक दैवदुर्विलासच.
घाटगे यांना मधुमेहाचा त्रास होता. काही वर्षांपूर्वी त्यांची अँज्योप्लास्टीही झाली होती. प्रकृतीबाबत ते दक्ष होते. रोज सायंकाळी कृषी महाविद्यालयाच्या आवारात फिरायला जात. मांसाहारही पूर्ण बंद केला होता. दोन-तीन दिवसांत धाप लागल्यासारखे वाटू लागल्याने सोमवारी त्यांनी डॉ. दिलीप कुलकर्णी यांची वेळ घेतली होती. काल दिवसभराची दीनचर्याही नेहमीचीच राहिली. दुपारी घरीच कार्यकर्त्यांशी बोलले. सायंकाळी फिरून आले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याचे त्यांनी पत्नीस सांगितले. म्हणून तातडीने त्यांनी मुलगा समरजित यांना बोलविले. दोघांनी धरून जिन्यावरून खाली आणतानाच ते कोसळले व तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. लगेच त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून घाटगे यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)

Web Title: Raje Vikram Singh Ghatge passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.