पावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथ, अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 05:01 PM2019-09-10T17:01:01+5:302019-09-10T17:10:49+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूराचे पाणी ओसरण्याची गती एकदमच संथ आहे. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून ९ राज्य तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे.

Rainy but slow to pour flood water, still under 3 dams | पावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथ, अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

पावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथ, अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

Next
ठळक मुद्देपावसाची उघडीप पण पूराचे पाणी ओसरण्याची गती संथअद्याप ५४ बंधारे पाण्याखाली 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी पूराचे पाणी ओसरण्याची गती एकदमच संथ आहे. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून ९ राज्य तर १५ प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघड-झाप राहिली तरी पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी स्थिर राहिल्याने नदीकाठच्या गावांची अस्वस्थता कायम आहे. पंचगंगेची पातळी ३९.११ फुटांवर कायम असून, ५४ बंधारे पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. रविवारी दिवसभर उघडीप राहिली, तर सोमवारी अधून-मधून सरी कोसळत राहिल्या. मंगळवारी उघड-झाप सुरू होती.

महापुरातून अजून कोल्हापूरकर सावरले नसल्याने पावसाचा जोर वाढला, की नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. मागील चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यात धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आणि नद्यांनी पुन्हा रौद्र रूप धारण केले.

रविवारी आंबेवाडीसह पूरबाधित गावांचे जिल्हा प्रशासनाने स्थलांतर सुरू केले. पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी नद्यांची पातळी कायम आहे.

 पंचगंगा नदीची पातळी ३९.१० फुटांवर कायम आहे. जिल्ह्यातील ५४ बंधारे पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 

गगनबावड्यासह पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चंदगड तालुक्यांत पावसाचा जोर आहे. करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगडमध्ये तुलनेने पाऊस कमी असून हातकणंगले, शिरोळमध्ये पूर्णपणे उघडीप राहिली आहे.

पिकांचे मोठे नुकसान

नदी व ओढ्याकाठचे ऊस, भातपिके अगोदरच कुजली आहेत. या पुराने उरली-सुरली पिकेही कुजू लागली आहेत. सततच्या पावसाने ऊस व भाताची वाढ खुंटली आहे. डोंगरमाथ्यावरील गवतही कुजू लागल्याने ओल्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

पडझडीत ६.५० लाखांचे नुकसान

सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २५ हून अधिक खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये साडेसहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

पातळी स्थिर राहिल्याने स्थलांतर थांबविले

पुराचे पाणी वाढत गेल्याने सुरक्षिततेसाठी शिरोळ ४ गावातून ११२ तर करवीरमधील दोन गावांतून २५९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. कोल्हापूर शहरातील सुतारवाड्यात ९ कुटुंबांतील २८ व्यक्तींचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले होते.  पावसाचा जोर ओसरला त्यात नदीची पाणी पातळी स्थिर राहिल्याने प्रशासनाने स्थलांतरीत कुटुंबांची मोहीम तूर्त थांबविली आहे.

बारा प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यातील ९ राज्य तर प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली असल्याने एस. टी. चे बारा मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे. यामध्ये कोल्हापूर-गगनबावडा, रंकाळा-आरळे, गारगोटी-वाळवा, कागल-भोगावती, गगनबावडा-गारवडे, चंदगड-नांदवडे, चंदगड-गौसे-इब्रामपूर, मलकापूर - शित्तूर या मार्गांवरील वाहतूक कोलमडली आहे.
 

 

Web Title: Rainy but slow to pour flood water, still under 3 dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.