कोल्हाूपर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पातळी कमी; पण अद्याप अठरा बंधारे पाण्याखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 18:58 IST2018-07-07T18:47:12+5:302018-07-07T18:58:44+5:30
कोल्हाूपर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता उघडीप राहिली. पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळीही घसरू लागली असून, अद्याप अठरा बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे.

कोल्हाूपर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, नद्यांची पातळी कमी; पण अद्याप अठरा बंधारे पाण्याखालीच
कोल्हाूपर : जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता उघडीप राहिली. पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळीही घसरू लागली असून, अद्याप अठरा बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे.
मागील दोन दिवस जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. शुक्रवारी सायंकाळी पंचगंगेची पातळी ३० फुटांच्या वर पोहोचली होती; पण शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या.
धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली. शनिवारी सायंकाळी पंचगंगेची पातळी २९ फुटांपर्यंत खाली आली. घटप्रभा व कोदे धरणांतील विसर्ग कमी झाला असून, अनुक्रमे प्रतिसेकंद ४०६४ व ४६६ घनफूट विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी मात्र प्रतिसेकंद ८०० घनफूट विसर्ग कायम आहे.
जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी १६.५९ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात ४५.८३ मिलिमीटर झाला आहे. कोल्हापूर शहरात एक-दोन सरी वगळता दिवसभर उघडीप राहिली.
पडझडीत ६० हजारांचे नुकसान
नादोली (ता. भुदरगड) येथील ज्ञानू हरी पाटील यांच्या घराची भिंत कोसळून दहा हजारांचे नुकसान झाले. तुडये (ता. चंदगड) येथील केरू अवडण यांच्या घराची भिंत कोसळून ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
हातकणंगले (१.७५), शिरोळ (निरंक), पन्हाळा (८.४३), शाहूवाडी (३५.३३), राधानगरी (१८.३३), गगनबावडा (३२.००), करवीर (३.००), कागल (५.५७), गडहिंग्लज (४.४२), भुदरगड (२४.२०), आजरा (२०.२५), चंदगड (४५.८३).