तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
By Admin | Updated: June 8, 2015 00:50 IST2015-06-08T00:10:45+5:302015-06-08T00:50:38+5:30
चाहूल मान्सूनची : कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १४.४१ पावसाची नोंद

तिसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत सलग तिसऱ्या दिवशी वळीव पावसाने हजेरी लावली. मान्सून कर्नाटकमध्ये येऊन धडकला आहे. त्याची चाहूल रविवारी कोल्हापूरकरांना जाणवली. दिवसभर अधूनमधून आकाशात ढग दाटून येत होते; पण उष्माही अधिक राहिला. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १४.४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मान्सूनने केरळ व्यापला असला तरी तो महाराष्ट्रात येण्यास आणखी दोन-तीन दिवस लागणार आहेत; पण रोज पडणाऱ्या वळीव पावसाने मान्सूनची चाहूल लागली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला.
रविवारी सकाळपासून आकाशात अधूनमधून ढग दाटून येत होते. दिवसभर मान्सूनची सुरुवात केव्हाही होऊ शकते, असे वातावरण होते. सायंकाळी साडेपाच वाजता जोरदार सरी कोसळल्या.
सलग तीन दिवस पाऊस असल्याने खरीप पेरणीची धांदल उडाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भात, भुईमूग, तर पूर्वेकडे सोयाबीन पेरणीत शेतकरी मग्न झाला आहे. ऊस पिकाला मिरगी डोस टाकण्यासाठी खते खरेदीचीही शेतकऱ्यांची गडबड उडाली आहे. रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्णात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६६ मिलिमीटर झाला.
मृग नक्षत्र आजपासून
आज, सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राला कोल्हा वाहन असल्याने या काळात पाऊस कमी असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
धरणक्षेत्रातही दमदार पाऊस
गेले दोन दिवस जिल्ह्यापेक्षा धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला होता; पण रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, वारणा धरणक्षेत्रांत सरासरी ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.