रॅगिंगमुळे हळव्या मनावर ओरखडे
By Admin | Updated: August 26, 2014 23:55 IST2014-08-26T23:44:40+5:302014-08-26T23:55:54+5:30
एन. जे. जमादार : शिवाजी विद्यापीठात कायदेविषयक कार्यशाळा

रॅगिंगमुळे हळव्या मनावर ओरखडे
कोल्हापूर : रँगिंगमुळे केवळ शारीरिक इजा होते असे नाही, तर हळव्या मनावर कायमस्वरूपी ओरखडे उमटले जातात. कित्येक विद्यार्थ्यांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. रॅगिंग विरोधी कायदा मंजूर होण्यामध्ये भारतीय न्याय पालिकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालक, शैक्षणिक संस्था यांची भूमिकाही महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी आज, मंगळवारी येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयातून विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक माहिती कायर्शाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात झालेल्या या कायर्शाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.
यावेळी न्या. जमादार म्हणाले, भारतीय राज्यघटनेने नागरिकांना प्रदान केलेला जगण्याचा अधिकार हा त्यांच्या सन्मानपूर्वक जगण्याची खात्री देतो. घटनादत्त अधिकारांचा उपभोग घेत असताना आपल्या कर्तव्यांचेही भान नागरिकांनी सदैव बाळगण्याची गरज आहे. ८६ व्या घटनादुरुस्तीने भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क प्रदान केला. त्यामुळे मोफत व सार्वत्रिक शिक्षण देण्यास सरकार बांधिल आहे. युवकांनी शिक्षणाच्या हक्क, कायदा याचे चळवळीत रूपांतर करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले की, शिक्षण ही केवळ पदवी संपादनाची नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासाची निरंतर प्रक्रिया आहे. आयुष्यात चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यांचा सारासार विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये विकसित करून घेतली पाहिजे. रॅगिंग हा प्रकारही असाच आहे. संबंधित विद्यार्थ्याला तत्काळ निलंबित करण्याचे किंवा कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने प्रदान केले असले तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान होऊ नये, याचा शिक्षक म्हणून आम्हाला विचार करावा लागतो. त्यासाठी प्रामुख्याने संबंधित विद्यार्थ्यांचे उद्बोधन आणि प्रबोधन करण्यावर आमचे प्राधान्य असते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कायर्शाळेत कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. पाटील यांनी ‘शिक्षणाचा अधिकार’ या विषयावर, तर जिल्हा न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी ‘रॅगिंग प्रतिबंधक कायदा’ या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, विधी सेवा प्राधिकरणाचे जिल्हा सचिव रा. दा. पाटील, जिल्हा सरकारी वकील डी. जे. मंगसुळे, विद्यापीठाच्या विधी अधिकारी अनुष्का कदम, पल्लवी कोरगावकर, आदी उपस्थित होते.
विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्वागत केले, तर विद्यापीठाचे विधी सल्लागार संतोष शहा यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रल्हाद माने यांनी आभार मानले. विवेक कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)