राधानगरी-फेजिवडे रस्ता बनलाय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST2021-07-31T04:25:11+5:302021-07-31T04:25:11+5:30
राधानगरी : दाजीपूर-निपाणी या राज्यमार्गाच्या राधानगरीजवळील भागात रस्त्याची चाळण झाली आहे. राधानगरी ते फेजिवडेदरम्यान वाहन चालविणे जीवघेणे ...

राधानगरी-फेजिवडे रस्ता बनलाय जीवघेणा
राधानगरी : दाजीपूर-निपाणी या राज्यमार्गाच्या राधानगरीजवळील भागात रस्त्याची चाळण झाली आहे. राधानगरी ते फेजिवडेदरम्यान वाहन चालविणे जीवघेणे ठरत आहे. मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्याच्या धोकादायक स्थितीमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मागील अडीच वर्षांपासून हायब्रिड इम्युनिटी योजनेतून सुरू असलेल्या या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याची दुरुस्ती ही योग्य प्रकारे केली जात नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर राधानगरी ते फेजिवडे या अंतरात मोठी वाताहत झाली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. जागोजागी दीड-दोन फुटांपेक्षा मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान चारचाकी वाहनांचा खालील भाग रस्त्यावर टेकत आहे. कोकण-गोव्याला जाणाऱ्या अन्य घाटमार्गाची पडझड झाल्याने तिथून वाहतूक बंद आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक सध्या यामार्गे सुरू आहे. लहान वाहने व दुचाकी यांच्यासाठी हा रस्ता धोकादायक झाला आहे.
फोटो ओळ- निपाणी ते दाजीपूर या राज्यमार्गाच्या राधानगरी-फेजिवडेदरम्यानच्या रस्त्याची अशी चाळण झाली आहे. (फोटो : फिरोज गोलंदाज)