कोल्हापूर : बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या ६६ बनावट नोटा भरून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४३ हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या ८६ नोटा जप्त केल्या.निखिल किशन सरगर (वय ३०, सध्या रा. राजारामपुरी दुसरी गल्ली, मूळ रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली), अमोल गणपती पोतदार (४७, रा. डाकवे गल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि शिवप्रसाद दिलीप कदम (२५, सध्या रा न्यू शाहूपुरी, मूळ रा. वारणा कापशी, ता. शाहूवाडी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिक अमोल पोतदार हा निखिल सरगर याला कमी टंचाची सोन्याची साखळी तयार करून देणार होता. या बदल्यात सरगर याने त्याला ५०० रुपयांच्या बनावट नोटा दिल्या. पोतदार याने २४ सप्टेबर २०२४ रोजी मुलगा अधिराज याला पत्नीच्या बँक खात्यावर भरण्यासाठी ३७ हजार ५०० रुपये दिले. ते त्याने खरी कॉर्नर येथील महिंद्रा कोटक बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरले.मशीनच्या रिजेक्ट बॉक्समध्ये पडलेल्या ५०० रुपयांच्या ६६ नोटा बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेनुसार जोतिबा वसंतराव तिरवीर (रा. अंबाई टँक, कोल्हापूर) यांनी २८ सप्टेबर २०२४ रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
८६ बनावट नोटागुन्हा दाखल झाल्याचे समजताच तिन्ही संशयित पसार झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना अटक करून आणखी २० बनावट नोटा जप्त केल्या. तत्पूर्वीच ६६ नोटा जप्त केल्या होत्या. निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार प्रशांत घोलप, सतीश बांबरे, अमर पाटील आदींच्या पथकाने संशयितांचा शोध घेतला.