रब्बी हंगाम रखडला; पिकांच्या वाढी खुंटणार
By Admin | Updated: December 4, 2014 23:35 IST2014-12-04T22:19:41+5:302014-12-04T23:35:08+5:30
आॅक्टोबरमधील पावसाचा परिणाम : रोगांचा होणार प्रादुर्भाव; २५ पैकी १५ हजार हेक्टर क्षेत्रांतच पेरण्या

रब्बी हंगाम रखडला; पिकांच्या वाढी खुंटणार
आयुब मुल्ला - खोची --रब्बी हंगामाला उशीर झाल्याने जिल्ह्यात अद्यापही निम्म्या क्षेत्रावर पिकांची पेरणी झालेली नाही. नैसर्गिक वातावरणातील बदलांच्या परिणामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी रब्बीचे क्षेत्रही घटले आहे.
एक महिना उशिराचा फटका पिकांना बसण्याची चिन्हे असल्याने रोगांचा प्रादुर्भावही वाढणार आहे. एकीकडे या हंगामातील खतांची जय्यत तयारी आहे; पण ती वापरण्यास उठावच होताना दिसत नाही. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र सुमारे २५ हजार हेक्टर इतके आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या शक्यतो पूर्ण होतात; परंतु चालूवर्षी आॅक्टोबर हीटच जाणवली नाही. वास्तविक या कालावधीत सकाळी, संध्याकाळी थंडी, तर दुपारी उन्हाचा तडाखा जास्त असतो; परंतु या मोसमात पावसानेच हजेरी लावल्याने मशागती लांबल्या. मोसम उशिरा सुरू होत गेला. नोव्हेंबरमध्येसुद्धा थंडी वाढली नाही. त्यामुळे पेरण्या वेळात झाल्या नाहीत. ज्या काही प्रमाणात पेरण्या झाल्या, त्यांची वाढ होण्यास अडथळा येत आहे. उशिरा पेरण्या झालेल्या पिकांच्या पानांची, खोडांची वाढ खुंटली आहे.
अद्यापही गव्हाची पेरणी सुरू आहे. हरभरा, ज्वारी, मका या पिकांची काही प्रमाणातच पेरणी झाली आहे. या पिकांसह उसाच्या भरणीसाठी लागणारी खते मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मार्चपर्यंत पावणेदोन लाख टन खतांचा पुरवठा होईल, असे नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे; परंतु सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या हंगामातच सलगता नसल्याने खतांचा उठाव झालेला नाही.
आतापर्यंत १५ हजार हेक्टर क्षेत्रांवरच पेरण्या झाल्या आहेत. अद्यापही ४० टक्के क्षेत्र तसेच आहे. ते तसेच राहण्याची शक्यता आहे. कारण यापुढे जर पेरण्या केल्या, तर जानेवारीत करपा, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोट्यातील शेती करण्यापेक्षा अन्य पर्यायी पिकांच्या विचारात शेतकरी आहे.
काही प्रमाणात पडणाऱ्या धुक्याच्या द्राक्ष पिकांवर मात्र परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे चालू रब्बी हंगाम नैसर्गिक अवकृपेमुळे एक महिना उशिरा पुढे गेला अन् तो फायदेशीर सोडाच, शेतकऱ्यांना अन्य पिकांकडे वळविणारा ठरला आहे. त्यामुळे शासनाचा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आता रब्बी हंगामातील उरल्यासुरल्या उपायांबाबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीविषयक प्रबोधन करेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. उसाला चांगला दर मिळण्याची आशा लावून असलेला शेतकरी मार्चपर्यंत उसाकडे लक्ष देईल, अशी स्थिती आहे.
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा चाऱ्यासाठीच अधिक उपयोग करता येईल. मोहर सुटण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांनाही सध्याच्या वातावरणाचा फटका बसणार आहे. मात्र, भरणी केलेल्या ऊस लागणींना या पावसाचा फायदा झाला असून, उसाची वाढ जोमाने होईल.
- सुरेश मगदूम, तालुका कृषी अधिकारी