रा. कृ. कणबरकर यांचे निधन
By Admin | Updated: April 14, 2015 01:24 IST2015-04-14T01:24:58+5:302015-04-14T01:24:58+5:30
ज्ञानतपस्वी : कोल्हापुरात आज अंत्यसंस्कार

रा. कृ. कणबरकर यांचे निधन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्ञानतपस्वी रा. कृ. कणबरकर (वय ९४) यांचे सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास भोगावती (ता. करवीर) येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे.
कणबरकर यांच्या पश्चात पत्नी शालिनी, मुलगा डॉ. अरुण, मुली डॉ. अंजली साबळे, मेघा वागळे, डॉ. नमिता खोत, सून डॉ. सुवर्णा यांच्यासह जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज, मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची आयटीआयसमोरील नाळे कॉलनी येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार असून, पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
रा. कृ. कणबरकर हे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांच्याकडे भोगावती येथे राहत होते. या ठिकाणीच सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाइकांसह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना शोक अनावर झाला. कणबरकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानापासून सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
रा. कृ. कणबरकर हे मूळचे बेळगाव येथील. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे व्याख्याता म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. नंतर ते कऱ्हाडच्या एस. जी. एम. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य झाले. त्यानंतर त्यांनी उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे, कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयाचे, तसेच न्यू कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले. तेथून त्यांची १९८० साली शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक झाली. कुलगुरुपदाच्या कारकिर्दीत त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक समित्यांवर काम केले. येथून ते १९८३ साली निवृत्त झाले.
कणबरकर यांना शासनाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाला होता. शाहू मेमोरियल ट्रस्टचे ते २५ वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. त्यांना सन्मानाचा ‘शाहू’ पुुरस्कारही मिळाला होता. त्यांनी बाबूराव धारवाडे यांच्यासमवेत भाई माधवराव बागल विद्यापीठाची स्थापना केली. सध्या ते ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. (प्रतिनिधी)