प्रिन्स शिवाजी हॉलचा प्रश्न ‘हेरिटेज’कडे
By Admin | Updated: May 13, 2015 00:52 IST2015-05-13T00:07:14+5:302015-05-13T00:52:17+5:30
वास्तू संवर्धनाचा मार्ग सुकर : चार वर्षांनंतर प्रकरण मिटण्याच्या आशा

प्रिन्स शिवाजी हॉलचा प्रश्न ‘हेरिटेज’कडे
इंदुमती गणेश - कोल्हापूर -राजर्षी शाहू महाराज आणि सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांची चिरंतन आठवण ठेवणाऱ्या आणि कोल्हापुरातील हेरिटेज वास्तू असूनही जमीनदोस्त झालेल्या प्रिन्स शिवाजी हॉलचा चेंडू आता हेरिटेज कमिटीच्या कोर्टात गेला आहे. या कमिटीमुळे या हॉलसह शहरातील हेरिटेज वास्तूंच्या जतन-संवर्धनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ही कमिटी अस्तित्वात नसल्याचे कारण देत मनपाने हॉलच्या बांधकामाला परवानगी नाकारली होती.
गेल्या १६५ वर्षांची परंपरा असलेल्या करवीर नगर वाचन मंदिराच्या आवारातील प्रिन्स शिवाजी हॉल ही वास्तू १९२१ साली बांधण्यात आली. महापालिकेच्या हेरिटेज वास्तूंच्या यादीत करवीर नगर वाचन मंदिराच्या मुख्य इमारतीचा समावेश आहे. त्यात प्रिन्स शिवाजी हॉलचा उल्लेख नसला तरी मूळ इमारतीला लागूनच तो असल्याने त्यात ओघानेच याचा समावेश होतो. मात्र, विस्तारीकरणाच्या उद्देशाने २०१२ साली ही वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे करवीर नगर वाचन मंदिरच्या तत्कालीन संचालक मंडळाविरोधात मोठे आंदोलन झाले होते. अखेर महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या बैठकीत संस्थेच्या संचालकांनी प्रिन्स शिवाजी हॉल पूर्वी जसा होता तसा उभारण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर बांधकामासाठी २०१३ मध्ये आयुक्तांकडे परवानगी मागण्यात आली. मात्र, तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी ती नाकारली. त्यामुळे संचालकांनी न्यायालयात धाव घेतली. हेरिटेज कमिटी अस्तित्वात नसल्याने या संवेदनशील विषयात कोणताही धोका पत्करायला महापालिका तयार नव्हती. त्यामुळे निर्णयाविना गेली चार वर्षे हा विषय रेंगाळला होता. आता हेरिटेज कमिटीची स्थापना झाल्याने त्यांच्या मार्गदर्शन किंवा सल्ल्याशिवाय हेरिटेज वास्तूंसंबंधी कोणालाही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे प्रिन्स शिवाजी हॉलचा विषय आता या कमिटीच्या अखत्यारित गेला आहे.
पुरातन वास्तंूच्या साहित्याचे काय?
प्रिन्स शिवाजी हॉल पाडल्यानंतर त्याचे दरवाजे, खांब, खिडक्या हे सगळे साहित्य कॉँट्रॅक्टरला विकण्यात आले होते. मात्र, कोल्हापुरात आंदोलन झाल्यानंतर करवीर नगर वाचनालयाच्या संचालकांनी कॉँट्रॅक्टरला हे साहित्य परत मिळावे, अशी मागणी केली होती.
मात्र कॉँट्रॅक्टरने खरेदीदरापेक्षा अधिक रक्कम संस्थेकडे मागितल्याने गेल्या वर्षभरापासून हा विषयही निर्णयाविना प्रलंबित राहिला आहे. आता त्या साहित्याचे पुढे काय? हा प्रश्न आहेच.
कमिटी काय करणार !
हेरिटेज कमिटी नुकतीच स्थापन झाली आहे. आता या समितीच्यावतीने पुरातन वास्तूंसंदर्भात नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णयांविना प्रलंबित असलेल्या वास्तूंसंदर्भातील प्रकरणांचा प्रश्न सोडवण्यात येईल. त्यात प्रिन्स शिवाजी हॉल, खोलखंडोबासह जयप्रभा स्टुडिओ, शिवाजी पूल यांचा समावेश आहे. या वास्तूंची प्रत्यक्ष पाहणी करून हेरिटेज कमिटी काही मार्गदर्शन, सूचना करील. त्यानुसार महापालिकेच्यावतीने निर्णय देण्याची शक्यता आहे.
प्रिन्स शिवाजी हॉल पूर्ववत बांधण्याला महापालिकेने परवानगी दिली नसल्याने हा विषय रेंगाळला. गेल्या चार वर्षांत इमारतीचे बांधकाम मूल्यही वाढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर बांधकाम सुरू करणे आवश्यक आहे.
- अनिल वेल्हाळ
(कार्याध्यक्ष, ‘करवीर नगर वाचनालय’)
हेरिटेज कमिटी ही कोणालाही आडकाठी करण्याचे काम करीत नाही. इतिहासाची जपणूक, पर्यटनवृद्धी आणि पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धन हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून काम केले जाणार आहे. प्रिन्स शिवाजी हॉलसह काही वास्तूंच्या कागदपत्रांची आम्ही मागणी केली आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. - उदय गायकवाड
(सदस्य, हेरिटेज कमिटी)