The purchase of Diwali in the course of promotion | Diwali : प्रचाराच्या रणधुमाळीत दिवाळीच्या खरेदीची लगबग
Diwali : प्रचाराच्या रणधुमाळीत दिवाळीच्या खरेदीची लगबग

ठळक मुद्देप्रचाराच्या रणधुमाळीत दिवाळीची खरेदीदहा दिवसांवर आलेल्या सणासाठी बाजारपेठा सजल्या

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. विधानसभेसाठी उमेदवारांच्या प्रचाराचा तर सर्वसामान्य नागरिकांचा सणाच्या जय्यत तयारीसाठी खरेदीचा धुरळा उडत आहे.

गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणूक हा देशाच्या लोकशाहीचा उत्सव शारदीय नवरात्रौत्सव आणि दिवाळी हा पारंपरिक सणांचा उत्सव एकाचवेळी साजरा होत आहे. त्यातच नवरात्रौत्सवानंतर पंधरा दिवसांतच दिवाळी येत असल्याने दसऱ्यापासूनच नागरिकांकडून दिवाळीच्या तयारीला सुरुवात होते. त्यामुळे आता लोक सणाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.

यंदा दिवाळी महिनाअखेरीला आली आहे, त्याकाळात नोकरदारांकडे पैसे असतातच असे नाही त्यामुळे अशा नागरिकांची पगार झाल्यापासूनच दिवाळीची खरेदी केली जात आहे. त्यातच महिलांची भिशी, रिकरिंग अशा ठेवींचा कालावधी संपत असल्याने ही रक्कमही हातात आल्याने आता बाजारपेठांत उत्साहाचे वातावरण आहे.

दिवाळी खरेदीची सुरुवात होते ती कपड्यांनी. व्यावसायिकांकडे नव्या फॅशनचे कपडे आलेले असल्याने सध्या सर्वांत जास्त ग्राहक आहे तो कपड्यांच्या खरेदीसाठी. अलीकडे ब्रँडेड कपड्यांची चलती असल्याने या कपड्यांना सर्वाधिक मागणी आहे.

मंदीचे वातावरण आणि महापुराची पार्श्वभूमी यामुळे व्यावसायिकांकडून कपड्यांच्या खरेदीवर २० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत शर्ट, कुर्ते, जॅकेट, मुलींसाटी फ्रॉक, पटियाला, वेस्टर्न लुकचे कपडे, स्कर्ट-टॉप, पंजाबी ड्रेस, युवतींसह महिलांसाठी लाँग वनपीस, डिझायनर साड्या अशा वैविध्यपूर्ण कपड्यांनी महाद्वार रोड व राजारामपुरीतील शोरूम्स सजल्या आहेत.

याशिवाय विविध रंगांच्या रांगोळ्या, विविध रंगांतील पणत्या, डिझायनर पणत्या, डिझायनर हँगिंग पणत्या, दिवे, आकाशकंदील, मुलांकडून बनविण्यात येणाºया किल्ल्यांसाठी शिवाजी महाराज, मावळे, गावकरी, प्राणी तसेच मोठ-मोठे किल्लेही मन आकर्षून घेत आहेत.

शहरातील राजारामपुरी, महाद्वार रोड, शिवाजी पुतळा कटलरी मार्केट या प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ आहे. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराच्या वाईट स्मृती विसरून कोल्हापूरकरांकडून वर्षातील या सर्वांत मोठ्या सणाच्या स्वागताची तयारी सुरू आहे.

अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या दिवाळीनिमित्त सोमवारी कोल्हापुरातील रस्त्यांवर वेताच्या आकाशकंदिलांची विक्री केली जात होती. (छाया : अमर कांबळे)
 

 


Web Title: The purchase of Diwali in the course of promotion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.