लसीसाठी जनजागृती मात्र तुटवडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST2021-05-12T04:23:42+5:302021-05-12T04:23:42+5:30
शिरोळ : लसीचा पुरवठा होत नसल्याने शिरोळ तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेस मंगळवारी ‘ब्रेक’ लागला. एकीकडे लसीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती ...

लसीसाठी जनजागृती मात्र तुटवडा कायम
शिरोळ : लसीचा पुरवठा होत नसल्याने शिरोळ तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेस मंगळवारी ‘ब्रेक’ लागला. एकीकडे लसीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती होत असताना दुसरीकडे मात्र लसीचा साठाच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. ४५ वयोगटांपुढील लसीकरण ६२ टक्के पूर्ण झाले आहे तर १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना गेले अकरा दिवस लस दिली जात आहे.
दरम्यान, लस पुरवठा झाल्यानंतर पुन्हा लसीकरणास सुरुवात करणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
तालुक्यात आठ प्राथमिक केंद्रे, ३३ उपकेंद्रे, दोन ग्रामीण रुग्णालयांसह अन्य ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. प्रारंभीपासूनच या केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावून लस घेतली. सकाळी सहा वाजल्यापासून टोकन घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर गर्दी असते. पोलीस बंदोबस्तात लसीकरण होते. ४५ वर्षांपुढील लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यात आतापर्यंत या गटातील ६२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे तर १ मेपासून तालुक्यात शिरोळ येथे एकमेव केंद्रावर १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील नागरिकांना लस उपलब्ध केली आहे. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर दैनंदिन २०० लसीकरण केले जाते. आरोग्य यंत्रणेवर लसीकरणाचा मोठा ताण आहे. लसींची उपलब्धता होणे गरजेचे आहे.
दरम्यान, बहुतांशी केंद्रांवर सोमवारीच लसी संपल्या होत्या. मंगळवारी चार ठिकाणीच लसीकरण सुरू होते. गुरुवारी लसीचा पुरवठा झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी सांगितले.
फोटो - ११०५२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ येथे लसीकरण केंद्राबाहेर अशाप्रकारे नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतात. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)