‘पीटीएम’ची भक्कम तटबंदी
By Admin | Updated: January 21, 2017 00:52 IST2017-01-21T00:52:59+5:302017-01-21T00:52:59+5:30
बाळासाहेब निचिते

‘पीटीएम’ची भक्कम तटबंदी
बाळासाहेब गोलकिपिंग करताना विजेच्या चपळाईने हालचाली करीत. खासकरून उजव्या-डाव्या बगलेवर डाईव्हचे तंत्र त्यास चांगलेच अवगत होते. त्याच्या उत्कृष्ट गोलकिपिंगमुळे प्रतिस्पर्धी संघांना गोल करणे अवघड बनत असे. त्याला त्यामुळे ‘पीटीएम’ची भक्कम तटबंदी म्हणूनच ओळखले जाते. फुटबॉलप्रमाणे बाळासाहेब
‘खो-खो’मध्येही पारंगत होता.
मारुती परशराम निचिते तथा बाळासाहेब याचा जन्म पन्हाळा तालुक्यातील सातार्डे येथे झाला; पण शिक्षण आणि नोकरीनिमित्ताने तो मंगळवार पेठ येथे स्थायिक झाला. मंगळवार पेठेत फुटबॉलमय वातावरण आहे. प्रॅक्टिस, पीटीएममधील नामवंत फुटबॉलपटूंचा खेळ पाहून बाळासाहेब यासही फुटबॉलबाबत आवड निर्माण झाली. तो गल्लीतील मित्रांसोबत टेनिस बॉलच्या चेंडूने रस्त्यात दगडांचे गोलपोस्ट करून खेळत असत. नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. येथे कै. डी. के. अतितकर, कै. जयसिंग खांडेकर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. शालेय स्तरावर शासकीय स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १९ वर्षांखालील कै. दामूअण्णा मालवणकर शिल्ड ही स्पर्धा स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कोल्हापुरात सुरू होती. त्यामध्ये राजाराम हायस्कूल, न्यू हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, ना. पा. हायस्कूल व गडहिंंग्लजचे एम. आर. हायस्कूल यांचा प्रमुख सहभाग असे. वयाच्या १४व्या वर्षी दामूअण्णा शिल्ड स्पर्धेत पाटणकर हायस्कूलकडून बाळासाहेब गोलकिपर म्हणून खेळला. त्याच्या उत्कृष्ट गोलकिपिंगच्या जोरावर पाटणकर हायस्कूलने दामूअण्णा शिल्डचे विजेतेपद पटकाविले.
४ फूट ११ इंच उंचीच्या सामन्यांतही बाळासाहेब गोलकिपर या जागेवर खेळू लागला. बाळासाहेब याच्या उत्कृष्ट गोलकिपिंगमुळे तो प्रतिस्पर्धी संघांसाठी भक्कम तटबंदीच असायचा. अशाच एका सामन्यात ‘शिवाजी’चे प्रशिक्षक व खेळाडू जानू मास्तर यांनी बाळासाहेब याचे गोलकिपिंग पाहिले. बाळासाहेब याची बेडर वृत्ती, डाईव्ह मारून गोल अडविण्याचे कसब, आदी कौशल्ये पाहून जानू मास्तरांनी त्यास शिवाजी तरुण मंडळाच्या संघात ओपनकरिता गोलकिपर म्हणून खेळणार का?, अशी विचारणा केली. बाळासाहेब याने ही संधी दवडली नाही.
विजेची चपळता, कुशल संघटक, गोलकिपिंगमधील सर्व डावपेच अवगत, उजव्या-डाव्या दोन्ही बगलेवर डाईव्हचे आत्मसात असलेले तंत्र, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा बॉल कोठून येईल याचा अंदाज अगोदरच घेऊन गोलपोस्टमध्ये बाळासाहेब जागा निवडत. बाळासाहेब यास बालगोपाल संघाकडून गोलकिपर म्हणून आॅफर आली आणि एका नावाजलेल्या मातब्बर संघात त्याला आपल्यातील कौशल्ये पणाला लावण्याची संधी मिळाली. या संघात मार्गदर्शन, योग्य दिशा आणि प्रेरणा कै. डी. के. अतितकर, कै. जयवंत सरनाईक, रामभाऊ नलवडे यांच्याकडून त्याला मिळाली. घरापासून जवळ असणाऱ्या मोकळ्या जागा, शाहू स्टेडियम, शिवाजी स्टेडियम व प्रायव्हेट मैदान यांनी बाळासाहेब याच्यातील सुप्त गोलकिपर जागा केला. ‘बालगोपाल’मध्ये खेळताना रघू व लक्ष्मण पिसे, पांडबा आगळे, कै. प्रभाकर मगदूम, कै. उदय भोसले व कै. दत्ता तथा डी. एस. विचारे यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मजबूत फळी लाभली. या संघाकडून त्याने शाहू सुवर्णर् चषकासह कोल्हापूर शहरातील सर्व स्पर्धा खेळल्या. त्याशिवाय परगावी सांगली, मिरज, गडहिंग्लज, पुणे, मुंबई, सोलापूर, अकोला, आदी ठिकाणच्या स्पर्धांमध्येही गोलकिपर म्हणून बाळासाहेब याची कामगिरी नेत्रदीपक झाली. त्यानंतर निचिते पाटाकडील तालीम मंडळाच्या नव्याने सुरू केलेल्या संघात अनेक वर्षे त्याने गोलकिपरची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. आंतरविद्यापीठ फुटबॉल सामन्यांमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाचा प्रथम गोलकिपर होण्याचा मान मिळाला. (विद्यापीठाचा पहिला जी. के.) अशा रितीने सलग दोन वर्षे त्यांना हा मान मिळाला. हे वेस्ट झोनचे सामने कोल्हापूर व पुणे येथे झाले. फुटबॉलव्यतिरिक्त त्याने
‘खो-खो’मध्येही आपली चमक दाखविली. राजाराम कॉलेजमध्ये असताना शिवाजी विद्यापीठाकडून दोन वर्षे खेळून खो-खोत त्याने आंतर जिल्हास्तरीय अजिंंक्यपद मिळविले.
बाळासाहेब निचिते आजच्या पाटाकडील तालीम मंडळ फुटबॉल संघाचे उपयुक्त सल्लागार व संघटक आहेत. ते बी. ए. (आॅनर्स), एलएल. बी. (स्पेशल) असून, शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव या पदावरून निवृत्त झाले आहेत. फुटबॉलवेडे बाळासाहेब निवृत्तीनंतर निवेदक, समालोचक (मराठी + इंग्रजी) म्हणून कार्यरत आहेत. आजही न चुकता शाहू स्टेडियमवर सामना पाहण्यास ते आपली उपस्थिती दर्शवितात.
(उद्याच्या अंकात : शिवाजी इंगवले)