पन्हाळा तालुक्यात तंटामुक्त पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: January 14, 2015 23:38 IST2015-01-14T20:58:31+5:302015-01-14T23:38:22+5:30
धनादेश वितरण : तालुक्यातील माले, केखले, जोतिबा गावांचा समावेश

पन्हाळा तालुक्यात तंटामुक्त पुरस्कार प्रदान
कोडोली : महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील माले, केखले व वाडी रत्नागिरी (जोतिबा) या गावांना तंटामुक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अनेक गावांमधून तंटे गावातच मिटत असून, ही बाब आदर्शवत आहे. प्रत्येक गावांनी या अभियानात सहभागी होऊन तंटामुक्त आदर्श गाव निर्माण करण्याचे आवाहन शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांनी येथे केले.कोडोली (ता. पन्हाळा) पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माले, केखले, वाडी रत्नागिरी या गावांना धनादेश देऊन किसन गवळी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी माले गावास नऊ लाख आणि केखले व जोतिबा या दोन्ही गावांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केले.कोडोली पोलीस ठाण्याचे स. पो. नि. शरद मेमाने यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचा आढावा घेतला. माले गावच्यावतीने सरपंच बाळासाहेब कांबळे, उपसरपंच उत्तम पाटील, ग्रामसेवक सर्जेराव दाभाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ चौगुले, केखले गावच्यावतीने सरपंच ईश्वरा पाटील, उपसरपंच वनिता गिरवे, ग्रामसेवक शिवाजी पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सागर पाटील, तसेच वाडी रत्नागिरीच्या सरपंच रिया सांगळे, ग्रामसेवक जयसिंग बिडकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराव सांगळे, आदी पदाधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले. यावेळी तंटामुक्त समितीच्या कामात विशेष कामगिरी बजावलेल्या पोलीस हवालदार महादेव पाटील व पन्हाळा तालुका तंटामुक्त अभियानाचे प्रमुख महादेव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.