‘आरडीसी’साठी शासकीय जागा द्यावी
By Admin | Updated: December 16, 2014 00:49 IST2014-12-16T00:46:19+5:302014-12-16T00:49:42+5:30
‘बिल्डो २०१४’चा समारोप : असोसिएशन आॅॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सची मागणी

‘आरडीसी’साठी शासकीय जागा द्यावी
कोल्हापूर : संशोधन विकास केंद्रासाठी ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूर’ला शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्यावतीने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली़ असोसिएशनच्या वतीने शनिवार (दि. १३)पासून येथील मेरी वेदर ग्राउंडवर सुरू असलेल्या ‘बिल्डो २०१४’चा समारोप आज, सोमवारी झाला़ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतेज पाटील उपस्थित होते़ अध्यक्षस्थानी विभागीय वनअधिकारी दादासाहेब शेंडगे होते़
सतेज पाटील म्हणाले, आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सला संशोधन विकास प्रकल्पासाठी शासकीय जागा मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर सहकार्य करण्यास मी कटिबद्ध आहे़ असोसिएशनने आधुनिक काळात ग्राहकांच्या बदलत्या पसंतीचा विचार करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा़ कोल्हापूर शहरात गुंतवणूक म्हणून गृहक्षेत्राकडे पाहण्याचा नागरिकांचा कल वाढलेला आहे़ त्यामुळे इजिनिअरिंग आणि आर्किटेक्टस् क्षेत्रातील देशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथील विद्यार्थी, तसेच व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून द्यावे़ अध्यक्षीय भाषणात दादासाहेब शेंडगे म्हणाले, शहरातील लोकांना बांधकामासंबंधीच्या विविध सोयी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘बिल्डो - २०१४’ ने केले आहे़ या प्रदर्शनातील निसर्ग आणि पर्यावरणपूरक रचना धकाधकीच्या जीवनात उपयुक्त आहे़
असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे यांनी विविध शहरातील लोकांना बांधकामासाठी लागणाऱ्या विविध वस्तू व सेवांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा ‘बिल्डो’ प्रदर्शनाचा हेतू आहे, असे सांगितले़
यावेळी अभिजित जाधव, सुधीर राऊत, मधुकर पोवार, दादासाहेब शेंडगे, संदीप घाटगे, मिलिंद नाईक, शिवाजी पाटील, रवी पाटील उपस्थित होते़ मिलिंद नाईक यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)