इचलकरंजी : अनैसर्गिक व भरमसाट सूतदरवाढीमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत आला आहे. या सूत दरवाढीच्या विरोधात आज, शनिवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये यंत्रमागधारकांच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहेत.
यंत्रमागधारक संघटना व वस्त्रोद्योगातील नेतेमंडळींची बैठक पॉवरलूम असोसिएशनमध्ये झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये वाढलेल्या सूत दरासंदर्भात, तसेच सुताचा भरमसाट साठा करून ठेवून चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या सूत व्यापारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सुरूवातीला निदर्शने करून नंतर टप्प्याटप्प्याने सूत व्यापाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असे ठरविण्यात आले. बैठकीस सतीश कोष्टी, सागर चाळके, प्रकाश मोरे, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, विनोद कांकानी, जनार्दन चौगुले, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत कनोजे यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.