दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST2021-03-31T04:24:03+5:302021-03-31T04:24:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यास बडतर्फ करा, लैंगिक ...

Protests in front of Forest Department over Deepali Chavan suicide case | दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागासमोर निदर्शने

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वन विभागासमोर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यास बडतर्फ करा, लैंगिक छळविरोधी विशाखा समित्या स्थापन करा, या मागण्यांसाठी मंगळवारी रमण मळा येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने निदर्शने केली. योग्य कार्यवाही न झाल्यास पाच एप्रिलपासून काम बंद आंदोलनाचा इशाराही दिला.

दीपाली चव्हाण हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. कोल्हापुरातही फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनने मंगळवारी प्रादेशिक वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने दिलेल्या या निवेदनात या आत्महत्येची उच्चस्तरीय विभागीय स्तरावरील चौकशी करून दोषीवर कारवाई करा, अशी प्रमुख मागणी केली आहे.

परिक्षेत्र वन अधिकारी व असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार नलवडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महेश झांझुर्णे, युवराज पाटील, सुनील सोनवले, प्रियांका दळवी, संतोष चव्हाण, सचिन डोंबाळे या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

चौकट

प्रमुख मागण्या...

१) उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अभियोग चालवावा

२) अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांची विभागीय चौकशी करा

३) मेळघाट फौंडेशनची उच्चस्तरीय चौकशी करा

४) तपासासाठी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून दोषीवर गुन्हे नोंदवा

५) दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे

Web Title: Protests in front of Forest Department over Deepali Chavan suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.