ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST2021-03-22T04:22:09+5:302021-03-22T04:22:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विक्रम पाटील करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत ग्रामीण खेडी स्वच्छ समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी ...

The problem of smelly gutters in rural areas is serious | ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न गंभीर

ग्रामीण भागात दुर्गंधीयुक्त गटारींचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रम पाटील

करंजफेण : स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत ग्रामीण खेडी स्वच्छ समृद्ध होऊन लोकांचे आरोग्य निरोगी राहावे या हेतूने गाव विकासासाठी शासन लाखोंचा निधी खर्च करूनदेखील गावोगावी गटारींचा प्रश्न जैसै थे अवस्थेत असल्याचे विदारक चित्र निर्माण होऊ लागले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे.

प्रतिवर्षी शासनाचा ग्रामपंचायतींना येणारा वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून येणारा निधी यातील बहुतांश निधीची रक्कम ही गटारी बांधकामावर खर्च केली जात असल्याचे वास्तव आहे. गावोगावी गल्लीबोळांतील गटारी बांधकाम करण्यावर वर्षानुवर्षे शासनाचा लाखोंचा निधी खर्च होत असतो. गटारीमध्ये पावसाळ्यात साचलेला गाळ, नियमित पडणारा कचरा काढण्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या गटारी अनेक गावात जमिनीत गाडल्या गेल्या असून त्यावरून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याचे वास्तव चित्र आहे, तर गल्लीबोळांतील गटारींमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे दुर्गंधी पसरण्याबरोबर डासांच्या उत्पत्तीत वाढ होऊन मलेरियासारखे जीवघेणे आजार बळावत आहेत. त्यामुळे खेडी स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी ग्रामपंचायतीने गटारी बांधकामावर खर्च करण्याबरोबर स्वच्छ व वाहत्या गटारी राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोट...

बहुतांश गावांमध्ये गटारी तुंबलेल्या दिसून येतात. त्यामुळे गावोगावी दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून, आरोग्याच्या दृष्टीने ही धोक्याची बाब आहे. ग्रामपंचायतीने वेळोवेळी स्वच्छता ठेवण्याची आवश्यकता आहे.

शिवाजी यादव

उंड्री,(ता.पन्हाळा)

फोटो : ग्रामीण भागामध्ये गटारींच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

Web Title: The problem of smelly gutters in rural areas is serious