खासगी सावकारांचा नियम कागदावर, वसुलीचा मासिक १८ टक्के व्याजदर; कोल्हापूर जिल्ह्यात नोंदणीकृत किती..वाचा
By उद्धव गोडसे | Updated: July 30, 2025 18:03 IST2025-07-30T18:03:09+5:302025-07-30T18:03:25+5:30
धमकावून मालमत्ता बळकावल्या, विनापरवाना सावकारी फोफावली

संग्रहित छाया
उद्धव गोडसे
कोल्हापूर : राज्य सरकारने परवानाधारक खासगी सावकारांना कर्ज वसुलीसाठी व्याजदराचे नियम बंधनकारक केले आहेत. त्यानुसार वार्षिक ९ ते १८ टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी करता येते. मात्र, हा नियम कागदावरच राहतो. प्रत्यक्षात सावकारांकडून मासिक व्याज दराची आकारणी करून लूट केली जाते, अशा कर्जदारांच्या तक्रारी आहेत. थकलेल्या व्याजापोटी मालमत्ता बळकावल्या जातात. तसेच विनापरवाना सावकारांनी कर्जदारांचे जगणे हैराण केले आहे.
कर्ज पुरवठ्यासाठी बँकांची जटिल प्रक्रिया, कागदपत्रांची कमतरता आणि तातडीची गरज यामुळे अनेक गरजू व्यक्ती खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. कर्जदाराची पिळवणूक होऊ नये यासाठी राज्य सरकारने खासगी सावकारांसाठी नियमावली बंधनकारक केली आहे. २०१४ मध्ये केलेल्या कायद्यातील कलम ३१ नुसार खासगी सावकारांना निबंधक कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे तसेच शेती आणि बिगरशेती कर्जदारांना वार्षिक ९ ते १८ टक्के व्याजदराची आकारणी करावी असे निर्बंध घातले आहेत.
प्रत्यक्षात मात्र खासगी सावकारांकडून या नियमांचे पालन केले जात नाही. कर्जदाराला प्रोसेसिंग फी आकारली जाते. मासिक व्याजदराची आकारणी केली जाते. थकीत व्याज आणि मुद्दलवर चक्रवाढ व्याज लावले जाते. कोरे धनादेश घेतात. कमी रकमेच्या कर्जासाठी शेती, घर, प्लॉटची कागदपत्रे, दागिने तारण घेतात. यातून प्रचंड लूट केली जाते, अशी माहिती कर्जदारांनी दिली.
जिल्ह्यातील ३२७ सावकारांची नोंदणी
जिल्ह्यात केवळ ३२७ खासगी सावकारांची उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणी आहे. त्यांच्याकडून वार्षिक ३ लाख २० हजार ५०० रुपयांचा महसूल सरकारला मिळतो. विनापरवाना सावकारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात यांची संख्या जास्त आहे. नडलेल्या लोकांची तातडीची गरज भागवून नंतर ते लूट करतात. अशा अवैध सावकारांची शोध मोहीम राबविण्याची गरज आहे.
केवळ ११ शेतकरी कर्जदार
गेल्या वर्षभरात परवानाधारक खासगी सावकारांनी ५ हजार ७७४ जणांना १४ कोटी ५३ लाख २७ हजारांचे कर्ज दिले. यातील केवळ ११ कर्जदार शेतकरी आहेत. उर्वरित सर्व कर्जदार फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाले, खासगी नोकरी करणारे आहेत. घरगुती अडचण, वैद्यकीय उपचार, व्यवसाय अशा कारणांसाठी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले जाते.
व्याजदराचा नियम (वार्षिक)
कर्जाचा प्रकार - तारण कर्ज - बिगर तारण कर्ज
- शेती - ९ टक्के - १२ टक्के
- बिगरशेती - १५ टक्के - १८ टक्के
तालुकानिहाय खासगी सावकारांची संख्या
तालुका - सावकार
- कोल्हापूर शहर - १६७
- हातकणंगले - ८७
- करवीर - ३२
- पन्हाळा - ९
- गडहिंग्लज - ७
- भुदरगड - ७
- कागल - ५
- शाहूवाडी - ४
- राधानगरी - ३
- शिरोळ - २
- आजरा - २
- चंदगड - २
अवैध सावकारी रोखण्यासाठी आमच्या विभागाकडून वेळोवेळी छापेमारी करून कारवाई केली जाते. नागरिकांनी तक्रारी दिल्यास कारवायांची व्यापकता आणखी वाढेल. नियमबाह्य कर्जवाटप आणि वसुली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. - नीळकंठ करे - जिल्हा उपनिबंधक